मुख्य निवडणूक अधिका-यांकडून यंत्रणांच्या कामांचा आढावा









 मुख्य निवडणूक अधिका-यांकडून यंत्रणांच्या कामांचा आढावा

निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवा

 -मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम्

 

अकोलादि. 10 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत कुठेही अपप्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून देखरेख ठेवावी, तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम् यांनी आज येथे दिले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी अकोला मतदारसंघात यंत्रणांकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सभा श्री. चोक्कलिंगम् यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर आदी उपस्थित होते.

 

श्री. चोक्कलिंगम् म्हणाले की, गत निवडणुकीत मतदान कमी झालेली केंद्रे निवडून त्याठिकाणी ग्राम व तालुका स्तरावरील सर्व यंत्रणांना सहभागी करून घेत ‘स्वीप’ कार्यक्रम भरीवपणे राबवावा. मतदानाचे 75 टक्के उद्दिष्ट पूर्ण होणे आवश्यक आहे. निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राखली जावी. कुठेही प्रलोभन, आमिषाचा वापर होता कामा नये. आचारसंहितेचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई करावी. पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, वनविभाग यांनी सजग राहून चेक पोस्टवरील तपासणी, आवश्यक कारवाया वेळोवेळी कराव्यात. सोशल मिडीयावरील मजकुराचे संनियंत्रण काटेकोरपणे करावे. मतदान केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी उपलब्ध वेब कास्टिंगचा वापर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

 

ते पुढे म्हणाले की, मतदान केंद्रांवर उन्हाळा लक्षात घेता सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रांवरील सर्व आवश्यक प्रक्रियेबाबत संबंधितांना प्रशिक्षणाबरोबरच वेळोवेळी योग्य सूचना देऊन तशी खातरजमा करावी. अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करुन देणार आहे. त्याचे योग्य वाटप व्हावे. मायक्रो ऑब्झर्व्हरचे प्रशिक्षण काटेकोरपणे व्हावे. मायक्रो ऑब्झर्व्हरने त्यांना नेमून दिलेल्या तीन किंवा चार मतदान केंद्रांवर तपासणी करून तसा अहवाल देणे अपेक्षित आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेली प्रतिबंधात्मक कार्यवाही, नियमित अहवाल, मनुष्यबळ प्रशिक्षण आदी विविध बाबींचा आढावा श्री. चोक्कलिंगम् यांनी घेतला.

मतमोजणी स्थळाची पाहणी

आढावा बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम् यांनी महाराष्ट्र वखार महामंडळ गोदाम येथील निवडणूक सुरक्षा कक्ष व मतमोजणी ठिकाणाची पाहणी केली. याठिकाणी सुसज्ज व्यवस्था, पुरेसा बंदोबस्त आदी सर्व तयारी ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विविध सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच नोडल अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ