अतिवृष्टी मदत; सवलती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना लागू * प्रशासनाने आवश्यक प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी - पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर
जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीची दखल घेऊन शासनाने मदत आणि सवलती लागू करण्यास मान्यता दिली.त्याविषयीचा शासन निर्णय दि. 9 ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आला. या निर्णयात सुधारणा करून अकोट, बार्शिटाकळी, तेल्हारा, बाळापूर व पातूर यासह अकोला, मुर्तिजापूर या सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधव आणि कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे, असा विश्वास पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यातील सर्व बाधितांना दुष्काळसदृश्य परिस्थितीत लागू असणा-या सर्व सवलती देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस एका वर्षासाठी स्थगिती, तिमाही वीज देयकात माफी, परीक्षा शुल्कात माफी व १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची फी माफी जाहीर करण्यात आली आहे.
असे आहे विशेष मदत पॅकेज
शासनाने अतिवृष्टी व पूरग्रस्त बाधित क्षेत्रासाठी विशेष मदत पॅकेजही जाहीर केले आहे. पॅकेजनुसार जिरायत पिकांसाठी 8 हजार 500 रू. प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 17 हजार प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22 हजार 500 प्रति हेक्टर मदत मिळेल. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढण्यासाठी 18 हजार प्रति हेक्टर, तर जमीन खरडून गेली असल्यास अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 47 हजार प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली आहे.
पॅकेजनुसार आपतग्रस्त मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख अर्थसाहाय्य मिळेल. 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास 74 हजार रू.,60 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाख आणि जखमी व्यक्ती रुग्णालयात एका आठवड्याहून अधिक काळ दाखल असल्यास 16 हजार रू., तर त्याहून कमी काळ असल्यास 5 हजार 400 रू. पर्यंत मदत मिळणार आहे.
पूर्णतः नष्ट झालेल्या घरांसाठी (पक्क्या/कच्च्या) सपाट भागात 1.20 लाख, तर डोंगराळ भागात 1.30 लाख आणि अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरांसाठी 6 हजार 500 व कच्च्या घरांसाठी 4 हजार रू.पर्यंत मदत दिली जाईल. झोपडी नुकसानासाठी 8 हजार रू, तसेच गोठ्याच्या नुकसानासाठी 3 हजार रू.ची मदत मिळणार आहे.
मत्स्य व्यावसायिकांनाही बोटींची अंशत: दुरूस्तीसाठी ६ हजार व पूर्णत: नष्ट झालेल्या बोटीसाठी १५ हजार रू, तसेच जाळ्यांच्या दुरूस्तीसाठी निधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे, जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस एका वर्षासाठी स्थगिती, तिमाही वीज देयकात माफी, परीक्षा शुल्कात माफी व १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची फी माफी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, रब्बी हंगामात शेतक-यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हे. १० हजार रू. प्रमाणे ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत बँक खात्यामध्ये जाईल.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा