लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नारुकुल्ला
लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा –
राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नारुकुल्ला
अकोला, दि. १५ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा नागरिकांना
सेवेचा हक्क देणारा क्रांतिकारी कायदा आहे. अकोला जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी
होण्यासाठी सर्व यंत्रणांनी विहित वेळेत कार्यवाही करावी, असे निर्देश अमरावती विभागाचे
राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नारूकुल्ला यांनी आज येथे दिले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संबंधी श्री. नारूकुल्ला यांच्या
अध्यक्षतेत बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी
अधिकारी अनिता मेश्राम, महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे,
मनोज लोणारकर, संदीप अपार यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, विविध यंत्रणाप्रमुख
उपस्थित होते.
आयुक्त श्री. नारूकुल्ला म्हणाले की, या कायद्यानुसार नागरिकांना विहित
कालमर्यादेत शासकीय विभागांच्या अधिसूचित सेवा मिळणे आवश्यक आहे. लोकसेवा हक्क कायदा
संपूर्ण राज्यात सर्व शासकीय सेवा देणाऱ्या विभागांसाठी लागू करण्यात आला आहे. विहित
कालावधीत सेवा पुरविली नसल्यास ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली
आहे, विभागांतर्गत येणाऱ्या अधिकतम सेवा अधिसूचित करण्यासोबतच कायद्याच्या जनजागृतीसाठी
विभागप्रमुखांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, कायद्याच्या अंमलबजावणीत क्रमवारीनुसार नंदुरबार
जिल्हा आघाडीवर आहे. अकोला जिल्ह्याची क्रमवारी सुधारणे आवश्यक आहे. विभागप्रमुखांनी
आपल्या अधिनस्त अधिका-यांचे मूल्यमापन नियमित करणे आवश्यक आहे. कायदा लागू होऊन अनेक
वर्षे झाली असतानाही अधिकारी अनभिज्ञ असतील तर ते गंभीर आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी
सर्व संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी. अर्जदाराला न्याय मिळवून देणे हे आपले सर्वांचे
कर्तव्य आहे. त्यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा