युवकांना नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण; पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ युवा शक्तीचे कुशल मनुष्यबळात परिवर्तन घडेल खासदार अनुप धोत्रे
युवकांना नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण; पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
युवा शक्तीचे कुशल मनुष्यबळात परिवर्तन घडेल
खासदार अनुप धोत्रे
अकोला, दि. 8 : देशात युवकांची
संख्या मोठी आहे. केंद्र व राज्य शासनाकडून युवकांसाठी नव्या युगातील उत्तमोत्तम कौशल्यांचे
प्रशिक्षण व रोजगारवृद्धीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. काळानुरूप कौशल्य प्राप्त
झाल्यामुळे युवा शक्तीचे कुशल मनुष्यबळात परिवर्तन घडेल, असा विश्वास खासदार अनुप धोत्रे
यांनी आज येथे व्यक्त केला.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे
रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या अभिनव उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते झाले. त्यानुसार अकोला येथील आयटीआय येथे खा. धोत्रे यांच्या उपस्थितीत
जिल्हास्तरीय कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हा
रोजगार सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्राचार्य
संतोष साळुंखे, आयटीआयचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे. विश्वकर्मा लाभार्थी ग्यानबा तुकाराम
बळकार, निदेशक अरविंद पोहरकर आदी यावेळी उपस्थित होते.
खासदार श्री. धोत्रे म्हणाले
की, युवकांचा कौशल्य विकास, तसेच आर्थिक स्वावलंबनासाठी कर्जहमी, प्रोत्साहनपर योजना
केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहेत. युवा शक्ती हे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे
नवतंत्रज्ञान व काळाची पावले ओळखून तयार केलेले उद्योग- संरेखित नवे अभ्यासक्रम देशात
मोठे कुशल मनुष्यबळ निर्माण करतील व देशाची दृढपणे आर्थिक विकासाकडे वाटचाल होईल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला कारागीर, स्थानिक कलाकार व पारंपरिक व्यवसायातील तज्ज्ञ
यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. विश्वकर्मा लाभार्थी ग्यानबा तुकाराम
बळकार यांच्या हस्ते वर्ग कक्षाचे उद्घाटन झाले. उपक्रमाद्वारे कौशल्य शिक्षणाचे विकेंद्रीकरण
करण्यात येत असून, अभ्यासक्रमांची निवड स्थानिक
मागणी व जनहिताच्या आवश्यकतेनुसार करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. साळुंखे यांनी
दिली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा