शेतक-यांनी कपाशीच्या एकाच वाणाचा आग्रह न धरता पर्यायी वाणांची निवड करावी जिल्हा प्रशासन व कृषी शास्त्रज्ञांचे आवाहन
शेतक-यांनी कपाशीच्या एकाच वाणाचा
आग्रह न धरता पर्यायी वाणांची निवड करावी
जिल्हा प्रशासन व कृषी शास्त्रज्ञांचे आवाहन
अकोला, दि. 29 : शेतकरी बांधवांनी कपाशीच्या विशिष्ट
वाणाचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध त्याच दर्जाच्या इतर पर्यायी वाणांची निवड
करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार, कृषी विभाग यांच्याबरोबरच डॉ.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केले आहे.
खरीप हंगामासाठी कपाशीच्या एकाच कंपनीच्या वाणाची
मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे सदर कंपनीचे बीजोत्पादन
कमी झाल्याने पुरवठ्यावर मर्यादा असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. त्याच दर्जाचे
इतर समतुल्य वाणही बाजारात उपलब्ध असून त्यांची
निवड करण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांसमवेत कृषी शास्त्रज्ञांनी केले आहे.
कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. व्ही. कायंदे म्हणाले की,
ठराविक वाणाची मागणी होत आहे. तथापि, त्याच दर्जाचे व चांगले उत्पादन मिळवून देणारे
अनेक वाण बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे कपाशीच्या ठराविक वाणांचा आग्रह न धरता बाजारात
उपलब्ध समतुल्य वाण घेऊन कपाशीची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात कपाशीच्या इतर वाणांचा मुबलक साठा उपलब्ध असून, शेतकरी बांधवांनी
त्याची निवड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार, जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी शंकर किरवे व कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा