आधार कार्ड नोंदणीतून सापडला पत्ता हरवलेले बालक जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत नातेवाईकांकडे सुपुर्द
आधार कार्ड नोंदणीतून सापडला पत्ता
हरवलेले बालक जिल्हाधिका-यांच्या
उपस्थितीत नातेवाईकांकडे सुपुर्द
अकोला, दि. 20 : उत्तरप्रदेशातून हरवलेला
एक मूकबधीर मुलगा बाळापूर पोलीसांना सापडला. महिला व बालविकास विभागाने त्याची आधार
नोंदणी करून पत्ता शोधून काढला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत आज त्याला
नातेवाईकांच्या सुपुर्द करण्यात आले. जिल्हाधिका-यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाला
बालकल्याण समितीचे सदस्य उपस्थित होते.
साधारणत: 18 वर्षांचा मात्र, मूकबधीर असल्याने संवादाची
अडचण असलेला मुलगा बाळापूर पोलीसांना दोन महिन्यांपूर्वी आढळला. त्यांनी त्याला बालकल्याण
समितीकडे सादर केले. समितीच्या आदेशाने त्या बालकास शासकीय बालगृह येथे दाखल करण्यात
आले. मुलगा मूकबधीर असल्याने त्याचा मूळ पत्ता शोधून काढणे हे आव्हान होते. त्यासाठी
मूकबधीर शाळेच्या शिक्षिकेची मदत घेण्यात आली. मात्र, त्या प्रयत्नांचा तितकासा उपयोग
झाला नाही. त्याला केवळ स्वत:चे नाव लिहिता येत होते. त्यावरून त्याचे नाव सतीश असल्याची
माहिती मिळाली. मात्र, सतीशचा पत्ता मिळत नव्हता. शिक्षक संजय मोटे यांनी त्याला विवीध
रेल्वे स्थानकांची चित्रे दाखवली तथापि, तोही प्रयत्न निष्फळ ठरला. नंतर त्याला आधारकार्ड
दाखविण्यात आले. तेव्हा त्याने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर शोधप्रक्रियेला वेग
मिळाला.
असा लागला ‘आधार’च्या आधारे शोध
त्यानंतर सतीशला नितेश शिरसाट
यांच्या आधारकार्ड सेंटरला नेण्यात आले. त्याची आधार नोंदणीची प्रक्रिया करण्यात आली.
तथापि, सतीशचे आधीच आधारकार्ड असल्याने नोंदणी होऊ शकत नाही व नुकतीच केलेली नोंदणी
प्रक्रिया रद्द झाल्याचा संदेश श्री. मोटे यांना मोबाईलवर प्राप्त झाला.
त्यानुसार जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर यांनी ‘आधार’च्या
ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पूर्वीचे
आधारकार्ड असल्याने नव्याने केलेली प्रक्रिया रद्द झाल्याचे प्रतिनिधीने सांगितले व
तक्रार दाखल करून घेतली. तक्रारीचे काही दिवसांनी निराकरण होऊन पूर्वीचा नामांकन क्रमांक
प्राप्त झाला. त्या क्रमांकानुसार पीव्हीसी आधारकार्डची मागणी करण्यात आली. त्याच्या
पावतीवर आधार क्रमांक प्राप्त झाला.
आधार क्रमांक मिळताच सतीशला पुन्हा केंद्रावर नेण्यात आले. आधार क्रमांक व त्याच्या बोटांचे ठसे घेऊन पूर्वीचे
आधारकार्ड डाऊनलोड करण्यात आले. त्यावेळी तो उत्तरप्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील
असल्याचे कळले. त्यावेळी तातडीने त्याच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात आला. आपला मुलगा
सुखरूप असल्याचे कळताच कुटुंबियांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. सतीशचे भाऊजी
रवींद्र पाल हे आज अकोल्यात उपस्थित झाले. जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत त्याला त्यांच्या
सुपुर्द करण्यात आले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश
पुसदकर,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अनिता
गुरव, राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, शीला तोष्णीवाल, डॉ. विनय दांदळे यांच्या मार्गदर्शनात
ही प्रक्रिया राबविण्यात आली. अधिक्षक जयश्री हिवराळे, संजय मोटे, चाईल्डलाईनच्या समुपदेशका
शरयू तळेगांवकर, अनिल इंगोले, प्रमोद ठाकूर, नितेश शिरसाट यांचे सहकार्य लाभले. अकोला
येथील समिती व महिला बालविकास विभागाकडून आधारकार्ड प्रक्रियेची मदत घेऊन आतापर्यंत
या पद्धतीने चार बालकांचा शोध लावण्यात आला. ही बाब इतर जिल्ह्यातील प्रशासनालाही मार्गदर्शक
ठरत आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा