उगवण क्षमता तपासण्याच्या सोप्या पद्धती बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी - ‘एसएओ’ शंकर किरवे यांचे आवाहन

 

उगवण क्षमता तपासण्याच्या सोप्या पद्धती

बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी

-        ‘एसएओ’ शंकर किरवे यांचे आवाहन

अकोला, दि. 8 : बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती सोप्या आहेत. तसे तपासून घरचे बियाणे वापरून पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

गोणपाट वापरून उगवण क्षमता कशी तपासावी?

बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मूठभर बियाणे काढा. सर्व पोत्यातून काढलेले बियाणे एकत्र करुन घ्या. गोणपाटाचा चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धूवून घ्या. एक तुकडा जमिनीवर पसरवा. पोत्यातून काढलेल्या बियाण्यातून सरसकट शंभर दाणे मोजून दीड- दोन सेंमी अंतरावर (बोटाचे एक कांडे अंतरावर) दहा-दहाच्या ओळीत गोणपाटाच्या तुकड्यावर रांगेत ठेवावे. अश्या प्रकारे शंभर दाण्यांचा नमुना तयार करावा.

गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी मारावे. गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यासकट गुंडाळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवावा. त्यावर अधूनमधून पाणी शिंपडून ओले ठेवावे.

सहा व सात दिवसांनी ही गुंडाळी जमिनीवर पसरून उघडावी. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजावेत. शंभर दाण्यापैकी सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त दाण्यांना चांगले कोंब फुटले असतील तर बियाणे बाजारातील प्रमाणित बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजावे व शिफारशीप्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरावे. जर उगवण झालेल्या बियाण्याची संख्या सत्तरपेक्षा  कमी असेल तर एकरी बियाण्याचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करता येईल.

 

वर्तमानपत्राचा कागद वापरुन क्षमता चाचणी

वर्तपान पत्राचा एक कागद घेऊन त्याच्या चार घड्या कराव्यात. त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडुन वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेऊन त्यांची गुंडाळी करावी. अशा रीतीने शंभर बियाच्या दहा गुंडाळ्या तयार कराव्यात. त्या गुंडाळ्या पॉलिथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्यामधील अंकुर मोजावेत.

 

पाण्यात भिजवून चाचणी (कमी वेळेत)

बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मूठभर बियाणे काढा. सर्व पोत्यातून काढलेले बियाणे एकत्र करून घ्या. पोत्यातून काढलेल्या बियाण्यातून सरसकट शंभर दाणे मोजून घ्या. शक्यतो काचेच्या ग्लासात पाणी घेऊन त्यात हे शंभर दाणे टाका. पाच ते सात  मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाणी फेकून देऊन दाणे वेगळे काढा. त्यामधील पूर्णत: फुगलेले तसेच बियाण्याच्या टरफलावर सुरकुत्या पडलेले दाणे वेगळे करा.

दोन्ही प्रकारच्या दाण्याची संख्या मोजुन घ्या. जो दाणा पाच ते सहा मिनिट पाण्यात ठेवल्यानंतर चांगला फुगतो, तो पेरणीसाठी अयोग्य असतो. कारण अश्या बियाण्याच्या टरफलाला इजा झालेली असल्याने किंवा बीजांकुर कुजल्यामुळे त्यामध्ये पाणी लवकर शिरते व तो लवकर फुगतो.

मात्र, जे बियाणे चांगले असते त्याचे टरफल शाबूत असल्यामुळे त्याच्यात पाणी आत शिरत नाही. फक्त टरफलातून पाणी आत गेल्यामुळे त्यावर सुरकुत्या पडल्यासारखे दिसते. शंभर दाण्यापैकी जर सरासरी सत्तर किवा जास्त दाणे अशाप्रकारे न फुगलेले असेल तर बियाणे गुणवत्तेचे समजावे.

प्रत्येकवेळी नवीन बियाणे खरेदी करण्याची गरज नाही

 

प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करुनच पेरणी करावी, असा समज आहे. मात्र, सोयाबीन, मूग, उडीद, चवळी, हरभरा, भूईमूग, गहू या पिकांमध्ये स्वपरागसिंचन होते. त्यामुळे कोणतेही संकरित वाण या पिकांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे सरळ वाणाचे बियाणे एकदा विकत घेतल्यानंतर त्यापासून तयार होणारे बियाणे आपण पुढील दोन वर्षे बियाणे म्हणून वापरु शकतो. पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशक व जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया अवश्य करावी व घरचेच बियाणे वापरावे, असे आवाहन श्री. किरवे यांनी केले.

०००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम