पशुपालक बांधवांनी पशुधनाचे ‘इअर टॅगिंग’ करून घ्यावे - जिल्हाधिकारी अजित कुंभार
पशुपालक बांधवांनी पशुधनाचे ‘इअर टॅगिंग’ करून घ्यावे
- जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला दि. 22 : अकोला जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुधनास कानात बिल्ला लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. सर्व पशुपालक बांधवांनी पशुधनाचे इअर टॅगिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन "भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये ईअर टॅगिंगच्या (१२ अंकी बार कोड) नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यु नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंधत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. थोडक्यात सदर प्रणालीवर संबंधीत, पशुधनाची प्रजनन, आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू, इ. सर्व माहिती उपलब्ध होते.
त्याकरिता सर्व पशुधनास कानात बिल्ला लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी आवश्यक आहे. राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणे करून पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच "प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९" च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून त्यांची नोदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात येत आहे.
दि. १ जून नंतर सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांनी इअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था/दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही. तसेच आपल्या अधिनस्त असलेल्या कत्तल खान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैस वर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये.
सर्व महसूल, वन, वीज महावितरण विभाग यांनी नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही, कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
परराज्यातुन येणाऱ्या पशुधनास इअर टॅगिंग केल्याची व त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा, तपासणी, नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी / कर्मचारी यांनी करावी. पशुधनास ईअर टॅगिंग केले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी/ कर्मचारी यांनी या पशुधनास ईअर टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी.
दि. ०१ जून पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी- विक्री व बैलगाडा शर्यती करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधनास बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी. तसेच सर्व ग्रामपंचायत, महसूल विभाग, गृह विभाग यांनी ईअर टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणा बाबतच्या नोंदी संबंधीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरित अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबधीत पशुपालकाची राहील.
पशुसंवर्धन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यातील पोलीस विभाग, वन विभाग, अकोला महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, महानगरपालिका, कटक मंडळ, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषंगीक प्रशासकीय विभागांनी काटेकोरपणे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा