खरीपासाठी बियाणे पुरवठ्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न उपलब्ध बियाण्याची खरेदी करण्याचे आवाहन
खरीपासाठी बियाणे पुरवठ्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
उपलब्ध बियाण्याची खरेदी करण्याचे आवाहन
अकोला, दि. 27 : खरीप हंगामासाठी कपाशीच्या एकाच कंपनीच्या बियाण्याची
मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. तथापि, नैसर्गिक आपत्तीमुळे बियाणे पुरवठ्यावर मर्यादा
आल्याचे निवेदन सदर कंपनीने कृषी विभागाला दिले आहे. इतर कंपनीचे कापूस बी. टी. बियाणेही
बाजारात उपलब्ध असून, उत्पादनक्षमता सारखीच असल्याने उपलब्ध बियाण्याची शेतक-यांनी
खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात कपाशी
पिकाचे 1 लाख 35 हजार 500 हे. क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यानुसार प्रतिहेक्टर 5 बियाणे
पाकिटानुसार 6 लाख 77 हजार 500 पाकिटाची मागणी कृषी आयुक्तालयाला करण्यात आली. त्याबाबत
पुरवठादार बियाणे उत्पादक कंपन्यांकडून पुरवठ्याचे नियोजनही प्राप्त करून घेण्यात आले.
त्यानुसार कंपन्यांनी 7 लाखांहून जास्त बियाणे पुरवठा करण्याचे नियोजनात नमूद केले.
तथापि, अकोला जिल्ह्यात दि. 16 मेपासून अजित सीडस् कंपनीच्या एकाच वाणाची
मागणी मोठ्या प्रमाणात दिसून आली. खरीप हंगाम 2023 मध्ये या कंपनीने 2 लाख 60 हजार
पाकिटाचा पुरवठा केला होता. मात्र, यंदा या कंपनीने केवळ 1 लाख 23 हजार 700 पाकिटे
पुरवठ्याचे नियोजन सादर केले. त्यावरून या कंपनीला कापूस बियाण्याचा अधिकाधिक पुरवठा करण्याबाबत सूचना
देण्यात आली. त्यानंतर सुधारित नियोजन करून कंपनीने 1 लाख 52 हजार पाकिटाचा पुरवठा
अकोला जिल्ह्यात केला आहे. त्यानुसार कृषी, महसूल व पोलीस कर्मचा-यांसमक्ष शेतक-यांना
टोकनवाटप करून विक्री करण्यात आली आहे. त्याहून अधिक पुरवठा करणे शक्य नसल्याचे निवेदन
कंपनीतर्फे अमरावती विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालकांना देण्यात आले आहे.
मागील वर्षी बियाणे उत्पादन क्षेत्रात
नैसर्गिक आपत्ती, मजुराचा अभाव त्यामुळे बियाणे उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे.
उत्पादित बियाणे गुणनियंत्रण विभागाच्या रिपोर्टनुसार बाजारात उपलब्ध करून देण्यात
येत आहे. वितरकांना शक्य तितका पुरवठा करण्याचा प्रयत्न असून, शासनाने निर्धारित केलेल्या
किमतीनेच विक्री करावी व कुठेही कृत्रिम टंचाई करू नये अशा सूचना विक्रेत्यांना करण्यात
आल्याचेही कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा