अकोला महासंस्कृती गीतरामायण व शिवसोहळ्याने अकोलेकर मंत्रमुग्ध

 










अकोला महासंस्कृती
गीतरामायण व शिवसोहळ्याने अकोलेकर मंत्रमुग्ध


अकोला, दि. १० : प्रभू श्री रामचंद्रांच्या कथेवर आधारित 'गीतरामायणा'चे श्रीधर फडके यांचे सादरीकरण व छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित 'शिवसोहळा' या कार्यक्रमाने अकोलेकरांना आज मंत्रमुग्ध केले.

सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित  महोत्सवात आज प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांनी 'गीतरामायण' सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित 'शिवसोहळा' हे महानाट्य भव्य
स्वरूपात सादर करण्यात झाले. महानाट्याचे भव्यदिव्य सादरीकरण उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाला अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती. प्रेक्षागृह खचाखच भरले होते.

प्रसिद्ध गायक श्रीधर फडके व सहकाऱ्यांनी सुमधूर स्वरात 'गीतरामायण' गाऊन श्रीरामकथा सादर केली. 'दशरथा हे घे पायसदान', 'सेतू बांधा रे सागरी' अशा अनेक रचनांनी श्री रामचरित्रातील अनेक प्रसंग जिवंत केले. यावेळी उपस्थित भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.


त्यानंतर सह्याद्री फौंडेशनच्या वतीने शिवसोहळा हे महानाट्य सादर करण्यात आले. शिवचरित्राचा भव्य पट, तत्कालीन वेशभूषा,अनेक कलावंत, हत्ती, घोडे, अप्रतिम नेपथ्य आदी भव्य सादरीकरणातून मंचावर श्री शिवकाळ डोळ्यासमोर उभा करण्यात आला. शिवरायांचे बालपण, तत्कालीन राजकारण, अंतर्गत संघर्ष, मॉं जिजाऊ यांनी दिलेली शिकवण, संस्कार, रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्यस्थापनेचा निर्धार, जीवाला जीव देणारे मावळे, युद्धातील पराक्रम, प्राणांची बाजी लावून निर्माण केलेले स्वराज्य असा भव्य पट अनेक प्रसंगांतून शिवचरित्र साकारण्यात आले. कलावंतांचा जबरदस्त अभिनय, नेपथ्य, अप्रतिम गाणी, भव्य स्टेज व त्यापुढील जागेचा केलेला वापर, तसेच सादरीकरणात कुठलीच कसूर ठेवलेली नव्हती. या भव्य सादरीकरणाने अकोलेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. नीलेश जळमकर यांचे दिग्दर्शन होते. प्रारंभी स्थानिक कलावंतांनी आपली कला सादर केली. मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचा गौरव करण्यात आला.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ