नामनिर्देशनपत्र भरताना निवडणूक आयोगाच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात - जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार

 नामनिर्देशनपत्र भरताना निवडणूक आयोगाच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात

- जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 26 : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना इच्छूक उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केली आहे.

नामनिर्देशनपत्र दि. 28 मार्च ते दि. 4 एप्रिल या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी  3 या वेळेत निवडणूक निर्णय अधिका-यांच्या दालनात स्वीकारण्यात येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाहीत. नामनिर्देशनपत्र https:Suvidha.eci.gov.in या भारत निवडणूक आयोगाच्या सुविधा पोर्टलवर उमेदवार लॉगईनवर रजिस्‍ट्रेशन करून नामनिर्देशन फॉर्म ऑनलाईन पध्‍दतीने भरून त्‍याची प्रिंट करून जिल्‍हा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे संबंधित कागदपत्रांसह सादर करावी. उमेदवार किंवा त्यांचे कमीत कमी एका प्रस्तावक किंवा सूचकाने स्वत: उपस्थित राहून नामनिर्देशनपत्र दाखल करणे आवश्यक आहे.  दोनपेक्षा जास्त लोकसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही.  एका लोकसभा मतदार संघात चार पेक्षा जास्त नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही.
उमेदवार निवडणूक लढवित असणा-या लोकसभा मतदारसंघाव्यतिरिक्त इतर लोकसभा मतदारसंघातील मतदार असल्यास, ज्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदार यादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करणे बंधनकारक आहे.
नामनिर्देशनपत्र व शपथपत्रात 2 से.मी. रूंदी  x 2.5 से.मी. उंची  आकाराचे अलीकडील काळातील छायाचित्र चिटकवावे . नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारासहित एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश असेल. उमेदवार अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याने याच लोकसभा मतदारसंघातील मतदार हे प्रस्‍तावक/ सुचक असणे बंधनकारक आहे. मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारास एक मतदार प्रस्‍तावक / सुचक म्हणून असणे बंधनकारक आहे.अपक्ष उमेदवार आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार यांना अकोला लोकसभा मतदारसंघातील 10 मतदार प्रस्‍तावक, सुचक  म्हणून असणे बंधनकारक आहे.
प्रस्‍तावक / सुचक अशिक्षीत असल्यास, त्यांनी त्यांचा अंगठा (ठसा) हा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक आयोगाने प्राधिकृत  केलेल्या उपविभागीय अधिकारी दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिका-यासमोर जाऊन त्यांच्याकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक राहील. Revised Form-26 मधील शपथपत्र मा.न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग किंवा नोटरी पब्लीक किंवा मा.उच्च न्यायालयाने शपथपत्र करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या शपथ आयुक्त यांचे समोर केलेले असणे बंधनकारक आहे. शपथपत्रावरील प्रत्येक पानावर उमेदवार यांची सही व नोटरी यांचा शिक्का असणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्रासोबत विहीत नमुन्यातील शपथपत्र सर्व माहिती भरून 100/- रुपये स्टॅम्प पेपरवर सादर करणे बंधनकारक राहील. शपथपत्रातील माहिती टिक /डॅश केलेली ग्राहय धरली जाणार नसून त्यामध्ये “NIL (निरंक) or “Not Applicable” (लागू नाही) अशी स्पष्ट माहिती नमूद करणे बंधनकारक राहील.
उमेदवारांनी मागील दहा वर्षाच्या कालावधीत कोणत्याही वेळी शासनाने दिलेल्या निवासस्थानाचा ताबा घेतलेला असल्यास, शासकीय निवासस्थानासाठी भाडे, वीज आकार , पाणीपट्टी, दुरध्वनी  आकार  यांच्या संबंधातील संबधित एजन्सीकडून घेतलेले  “ना देय प्रमाणपत्र” सादर करावे. राजकीय पक्षाच्या उमेदवाराने फॉर्म ए व बी यांची मूळ शाईची स्वाक्षरीत प्रत नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 4 एप्रिल रोजी दुपारी 3.00 वाजपर्यंत निवडणुक निर्णय अधिका-यांकडे दाखल करणे बंधनकारक आहे.
अनामत रक्कम 25 हजार रू. व उमेदवार हा एस.सी, एस.टी. प्रवर्गातील असल्यास 12 हजार पाचशे रू. (जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक) आहे. रक्कम शासकीय कोषागारात लेखाशिर्ष-8443-CIVIL DEPOSITS-121-DEPOSITS IN CONNECTION WITH ELECTION-2 –DEPOSITS MADE BY CANDIDATES FOR PARLIAMENT या लेखाशिर्षाखाली चलनाने भरावी व भरलेल्या चलनाची प्रत नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे.  अनामत रक्कम रोख स्वरुपात ही स्विकारली जाईल.
निवडणूकीसाठीचे स्वतंत्र बॅक खाते नव्याने उघडणे बंधनकारक आहे. त्यामध्ये लोकसभा निवडणूक व्यतिरिक्त  इतर कोणतेही व्यवहार असू नयेत. उमेदवाराने स्वत:चे नावे किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांचे सोबतचे संयुक्त बँक खाते केवळ सदर लोकसभा निवडणूक कामासाठीच काढलेले असणे बंधनकारक आहे. इतर कोणतेही संयुक्त बँक खाते ग्राहय धरले जाणार नाही. बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या कमीत कमी एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक आहे.
नामनिर्देशनपत्रासोबत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करावी. उमेदवाराने नामनिर्देशनपत्रा सोबत नजीकच्या काळात काढण्यात आलेला (निवडणूकीची अधिसूचना निघणेपूर्वी 3 महिन्याच्या आत) स्टॅम्प साईज (2 सेंमी रुंदी X 2.50 सेंमी उंची) व पांढऱ्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेला रंगीत (कलर) अथवा कृष्णधवल (ब्लॅक ॲण्ड व्हाईट) फोटो सादर करणे बंधनकारक आहे. तसेच सदर छायाचित्राच्या पाठीमागच्या बाजूस उमेदवाराची अथवा प्रतिनिधीच्या स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे तीन छायाचित्र स्वतंत्र दाखल करावेत. तसेच नामनिर्देशनपत्र व शपथपत्रावर तसेच इतर  जागेवर वेगळे फोटो चिटकवावे. छायाचित्रावर पाठीमागे नाव नमूद करुन स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. छायाचित्र दाखल करतांना मा. भारत निवडणूक आयोगाचे विहित नमुन्यातील घोषणापत्र दाखल करणे आवश्यक आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करणेसाठी येताना तीनपेक्षा जास्त वाहने 100 मीटर परिसराच्या आत आणता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्र दाखल करते समयी आणण्यात येणारी वाहने, व्यक्ती, मिरवणूक व इतर बाबी यावर होणारा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात धरणे बंधनकारक आहे.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ