अकोल्यात आजपासून महासंस्कृती महोत्सव

 अकोल्यात आजपासून महासंस्कृती महोत्सव

अकोला, दि. 5 ; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त विविध प्रांतातील संस्कृतीचे आदानप्रदान, कला, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव होणार आहे. महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असून, अकोलेकरांनी या सांस्कृतिक पर्वणीचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे केले.  
महोत्सवात लोककला, पोवाड्यासह महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडणार असून, स्थानिक कलावंतांना संधी मिळणार आहे. लालबहादूर शास्त्री स्टेडीयममध्ये होणा-या महासंस्कृती महोत्सवाचे उदघाटन ६ मार्च रोजी सायंकाळी ५.४५ वा. होईल.  
पाच दिवसांच्या महोत्सवात  महाराष्ट्रातील विविध प्रदेशातील संस्कृतीचे दर्शन घडेल. स्थानिक कला, लोकगीत आदींबाबतही स्वतंत्र कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच भारूड, गोंधळ, पोवाडा, खडी गंमत, लोककलेतील विविध प्रकार, स्थानिक कला अशा कार्यक्रमांची रेलचेल असेल. स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम यात प्राधान्याने समाविष्ट करण्यात येतील. महिला बचत गटांचे स्टॉलही येथे उपलब्ध राहणार आहेत.  
लोककलेचा जागर
महासंस्कृती महोत्सवात ७ मार्च रोजी स्थानिक लोककलेचा जागर होणार आहे. मराठी चित्रपट असोसिएशनतर्फे अभंगवारी, गझलयात्रा, कविता, संस्कारांवर बोलू काही,  लोककला, पोवाडा, भारूड, गोंधळ यासह कलापथकांकडून सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात महागायक अनिरुद्ध जोशीसह ३० कलावंत जुईली जोगळेकर सहभागी होणार आहे.
सावित्रीबाई फुले व महात्मा फुले महानाट्य
८ मार्च रोजी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर महानाट्य होणार असून यात ७० कलावंत सहभागी होणार आहेत. तसेच पारंपरिक लोककलेचे वेषभूषेसह गीत, गायन होणार आहे. शाहीर विजय पांडे हे लोकशिक्षण, गोंधळ, कीर्तन सादर करणार आहेत. ९ मार्च रोजी लावणी कार्यक्रम होणार आहे.  
शिवसोहळा आणि गीतरामायण
महोत्सवात १० मार्च रोजी शिवसोहळा, गीतरामायण होणार असून, श्रीधर फडके व गृप २० पेक्षा जास्त कलावंतांसह सहभागी होणार आहेत. शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन राहणार असून, बचत गटांसह अन्य ४० स्टॉल्सही राहणार आहेत.
०००
--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ