आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध पोलीसांत तक्रार

 आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध पोलीसांत तक्रार

अकोला, दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयापासून  100 मीटरच्या आत प्रचाराचा मजकूर असलेली वाहने उभी केल्याबद्दल दोघांविरूद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अकोला पश्चिम मतदारसंघातील भरारी पथक क्र. 5 चे प्रमुख नीलेश बायस्कर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 100 मीटरच्या आत 2 मिनी ट्रक वाहने (क्र. एमएच 24 जे 9619 व क्र. एमएच25 पी 4373) लावण्यात आल्याचे पथकाला आढळले. वाहनाच्या दोन्ही बाजूंवर फ्लेक्सवर विकसित भारत मोदींची गॅरंटी व कमळ  पक्षचिन्ह आदी प्रचार मजकूर आढळून आला. पथकाच्या सदस्यांनी तत्काळ नोंद घेतली. पथकाने चालकांना विचारणा केल्यावर वाहनावरील फ्लेक्स काढून दोन्ही वाहनचालक वाहने घेऊन परिसरातून निघून गेले. अंबादास नरवाडे (पार्डी, ता. जि. हिंगोली) व निवृत्ती जाधव (किरोडा, ता. लोहा, जि. नांदेड) अशी चालकांची नावे आहेत.

 

या वाहनांना परवानगी प्राप्त नसल्याचे  व प्रचार मजकूर असलेले वाहन निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयाच्या परिसरात आणल्याने आचारसंहितेचा भंग झाला असून, भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा नोंदवावा, अशी लेखी  तक्रार पथकप्रमुख श्री. बायस्कर यांनी सिटी कोतवाली येथील ठाणेदार यांच्याकडे छायाचित्रणाची सीडी व वाहनचालकांच्या आधारपत्र व माहितीसह दाखल केली आहे.

 

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव, तसेच कृषी अधिकारी मिलिंद जंजाळ यांच्या मार्गदर्शनात श्री. बायस्कर, बाळाभाऊ काकड, राजेश पिंजरकर, विनोद गव्हाळे, संदीप ढगे, प्रशिक गुळदे आदी पथकाने ही कार्यवाही केली. तक्रार प्राप्त होताच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ