विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीने एक संसार सावरला

 विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीने एक संसार सावरला

अकोला, दि. ३० : विभक्तीच्या उंबरठ्यावर असलेला एका दांपत्याचा संसार विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीने सावरला.

हकीकत अशी की, मुर्तिजापुर येथील एक विवाहिता विवाहानंतर बाळापूर येथील एका गावी सासरी नांदण्यास गेली होती. काही वर्षे पति-पत्नि यांचा संसार सुरळीत सुरु होता. त्यांना दोन अपत्ये ही झाली होती. परंतु मागील काही महिन्यापासून पति पत्निमधील संबंध विकोपास गेले होते. पत्नी अनेक महिन्यापासून माहेरी राहत होती. अनेक प्रयत्न करुनही पति-पत्निमध्ये तडजोड होत नव्हती. सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोहर बेलोकार यांनी सदरचे प्रकरणात मध्यस्थी करीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला येथे दाखल केले. पति-पत्नि व त्यांचे कुटुंबिय यांचेत अनेक बैठका घेण्यात आल्या. परंतु एकत्र राहायचेच नाही असेच दोघांनीही ठरविले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे या प्रकरणात मध्यस्थी करण्यात आली. पति-पत्नि यांचेत वाद असले तरी दोघेही त्यांचे मुलांवर खुप प्रेम करत होते. दोघांनाही मुलांच्या भविष्याची काळजी होती. हिच बाब लक्षात घेवून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने दुरावलेल्या नात्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. अनेक बैठकाअंति पति-पत्नि त्यांच्या चिमुकल्यांसाठी एकत्र येण्यास तयार झाले. दोघांचाही संसार व्यवस्थित सुरु झाला. पति-पत्नित कितीही वाद असला तरी त्या चिमुकल्यांप्रति असलेल्या प्रेमामुळे वाद बाजुला सारला गेला आणि पति-पत्नितील दुरावलेले नाते त्या चिमुकल्यांसाठी एकत्र आले. पति-पत्नि मधील विसंवाद नाहीसा झाला. दोघांच्याही डोळयात आनंदाश्रु होते आणि चेह-यावर आनंद होता. विसंवाद व अबोला असल्यामुळेच गैरसमज तयार होतात. त्यातुनच वाद निर्माण होतात. मध्यस्थी केंद्रात मुक्तपणे संवाद साधता येतो. वादाचे कारण, परिस्थिती आणि परिणाम याची जाणीव करुन दिली जाते. या प्रकरणामध्ये सामजिक कार्यकर्ते श्री. मनोहर बेलोकार यांचीही मोलाची भुमिका ठरली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. एस. तिवारी यांचे मार्गदर्शनानुसार कार्यरत आहे.

आपसातील वाद न्यायालयात जाण्यापुर्वीच मध्यस्थी केन्द्रात मिटविण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश सु. पैठणकर, यांनी केले आहे व त्यासाठी "न्यायसेवा सदन कार्यालय" जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला, जिल्हा न्यायालय, अकोला येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ