अकोल्यात महासंस्कृती महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 अकोल्यात महासंस्कृती महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन

-         पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  

अकोला, दि. 6 : महाराष्ट्राची भूमी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असून येथील वैविध्य, कला, बोली, संगीत यांचे दर्शन महासंस्कृती महोत्सवातून घडेल, असा विश्वास महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित पाच दिवसांच्या महासंस्कृती महोत्सवाची नामवंत गायकांचे सादरीकरण, अकोलेकरांचा उत्साह आणि जल्लोषात सुरूवात झाली.  पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचा ऑनलाईन शुभारंभ झाला. आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह आदी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की,  महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा मोठा आहे. येथील गौरवशाली इतिहास, पर्यटनस्थळे, कलावैभव, खाद्यसंस्कृती यांची जोपासना करण्यासाठी आणि स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यभर असे महोत्सव आयोजित केले जात आहेत. त्यामुळे स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन मिळून सांस्कृतिक क्षेत्रात चैतन्य निर्माण होत आहे.  

शासनाने कला, संस्कृतीचे दर्शन घडवितानाच स्थानिक कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आमदार श्री. मिटकरी यांनी सांगितले.

 

कोकणापासून ते पूर्व विदर्भापर्यंत व-हाड, खानदेश, कोकणी, मराठवाडा, मानदेश, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र असा विविध प्रांतांनी महाराष्ट्र जोडला आहे. व-हाडी, तावडी, झाडीबोली, मालवणी, नागपुरी, आगरी, चंदगडी, कोल्हापुरी, मराठवाडी अशा विविध बोलींनी या प्रदेशातील मराठी भाषा समृद्ध केली आहे.

ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. पोवाडा, अभंग, गोंधळ, भारूड, खडी गंमत, लावणी असे अनेक कलाप्रकार येथे बहरले.  महाराष्ट्राचा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी प्रास्ताविकात सांगितले.

शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील लढाया, युद्धात, तसेच तत्कालीन महाराष्ट्रात संरक्षण कार्यासाठी वापरण्यात येणा-या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाला. ऐतिहासिक महात्म्य लाभलेल्या या शस्त्रांचे प्रदर्शन हे महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

बचत गटांच्या स्टॉलवर निरनिराळ्या पदार्थांची रेलचेल

व-हाडी खाद्यपदार्थांबरोबरच अवघ्या महाराष्ट्राची आवडती पुरणपोळी व अनेकविध पदार्थ महोत्सवात महिला बचत गटांच्या कक्षात उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील महिला बचत गटांना कक्ष उपलब्ध करून देण्यात आले असून, पदार्थांबरोबरच सेंद्रिय धान्यही उपलब्ध आहे.

स्वप्नील- वैशालीचे जबरदस्त सादरीकरण आणि अकोलेकरांचा जल्लोष

प्रसिद्ध गायक वैशाली सामंत व स्वप्नील बांदोडकर यांच्या गायनाने शुभारंभाच्या दिवसाची सायंकाळ बहारदार केली.  सारंग जोशी व श्रेया खराबे यांच्या गायनाने कार्यक्रमाची दमदार सुरूवात केली. श्रेयाच्या ‘अधीर मन झाले’ या गीताने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. त्यानंतर स्वप्नील बांदोडकर यांनी ‘अलबेला सजन आयो रे’च्या शास्त्रीय गायनाने सूरांची जबरदस्त उधळण केली. पुढे त्यांच्याच ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गाण्यालाही उपस्थितांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.

वैशाली सामंत यांनी ‘नावाची गोजिरी’ने सुरेल सुरुवात केली. पुढे स्वप्नील आणि वैशालीच्या गाण्यांनी रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली.राधा ही बावरी..हे गीत स्वप्नीलच्या तोंडून प्रत्यक्षात ऐकताना उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यावेळी त्याने केलेल्या आवाहनानुसार उपस्थित महिला व मुलांनी स्टेजवर येऊन गाण्याचा सूर धरला. वैशालीच्या प्रसिद्ध ‘ऐका दाजिबा’ या गाण्यानेही अशीच धमाल उडवून दिली. ‘राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील का’ सारख्या अनेक गाण्यांवर उपस्थितांनी स्टेजच्या पुढ्यात नाचत होते. सूर-तालांची ही बहारदार मैफल अविस्मरणीय ठरली. स्थानिक योद्धा ग्रुपच्या दमदार ढोलताशा वादनाने शुभारंभाच्या कार्यक्रमात चैतन्य आणले.

 

गुरूवारी ‘महाराष्ट्राची लोकधारा’   

गुरूवारी (7 मार्च) ‘महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात अभंगवारी, गझलयात्रा, कविता, पोवाडा, संस्कारावरती बोलू काही, लोककला, भारूड, गोंधळ, कलापथक, लोकनाट्य अशा अनेक सादरीकरणांबरोबरच, अनिरूद्ध जोशी व जुईली जोगळेकर यांचा महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा कला आविष्कार सादर होणार आहे.

०००

 


--






















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ