उन्हाळ्यात पशुधनाची अशी घ्या काळजी शासनाच्या मार्गदर्शक सूचना

उन्हाळ्यात पशुधनाची अशी घ्या काळजी

शासनाच्या मार्गदर्शक सूचना

अकोला, दि. 18 : सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.  जगदीश बुकतारे यांनी केले.

उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना चरण्यास सोडावे. हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्याची उंची जास्त असावी. जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील. छपराला शक्यतो पांढरा चुना अथवा रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा, तुराट्या, पाचट टाकावे. ज्यामुळे सूर्याची किरणे परावर्तित होण्यास मदत होईल. परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत. मुक्तसंचार गोठ्याचा अवलंब करावा. गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे, स्प्रिंकलर्स यासोबत पंख्याचा वापर करावा. दुपारच्या वेळेस गोठ्याच्या भोवती बारदाणे, शेडनेट लावावेत व शक्य असल्यास त्यांना पाण्याने भिजवावे, जेणेकरून उष्ण हवा गोठ्यात येणार नाही व आतील वातावरण थंड राहील. जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे आदी सूचना करण्यात आलेल्या आहेत.

वाढत्या उन्हामुळे जनावरे भरपूर पाणी पितात. अंगाची लाही लाही झाल्याने कोरडा चारा खात नाहीत. जनावरांच्या हालचाली मंदावतात. तसेच जनावरे सावलीकडे धाव घेऊन सावलीत स्थिरावतात. जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते, जोरात श्वास घेणे, भरपूर घाम येणे, अशी लक्षणे दिसू लागतात. दुभत्या जनावरांची उत्पादन क्षमता कमी होते. प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. जनावरांना वेळोवेळी जंतनाशक औषधे पाजावी, जनावरांचे नियमितपणे लाळखुरकुत, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार इत्यादी रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. जनावरांना दाटीवाटीने बांधू नये. लोखंडी हौदातील गरम पाणी पाजू नये. मृत जनावरांची विल्हेवाट नियमित चराऊ कुरणात करू नये, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले. 

 

000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ