लेख तेजस्विनी भवन: महिला सक्षमीकरणाचा नवा 'अकोला पॅटर्न'
लेख
तेजस्विनी भवन: महिला
सक्षमीकरणाचा नवा 'अकोला पॅटर्न'
अकोला जिल्ह्यातील डाबकी
रोड, उगलेवाडी येथे साकारलेले ‘तेजस्विनी भवन’ हे केवळ एक इमारत नसून महिलांच्या
आर्थिक क्रांतीचे आणि जिद्दीचे प्रतीक आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम)
सुवर्णमहोत्सवी वर्षात उभे राहिलेले हे भवन राज्यातील अशा प्रकारचे पहिलेच पाऊल आहे.
महिला जेव्हा आर्थिकदृष्ट्या
स्वावलंबी होते, तेव्हा केवळ तिचे कुटुंबच नाही, तर संपूर्ण समाजाचा विकास होतो. हेच
ब्रीदवाक्य समोर ठेवून अकोला जिल्ह्यातील लोकसंचालित साधन केंद्र (LRC) आणि बचत गटांतील
महिलांनी आपल्या परिश्रमातून आणि योगदानातून 'तेजस्विनी भवन' ही वास्तू उभी
केली आहे. ही इमारत केवळ सिमेंट-काँक्रीटचे बांधकाम नसून महाराष्ट्रातील महिलांच्या
स्वयंपूर्णतेचे एक आदर्श उदाहरण आहे.
महाराष्ट्रात 'माविम'
अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात, परंतु साधन केंद्राने स्वतःच्या बळावर इमारत उभारण्याची
ही राज्यातील पहिलीच घटना आहे. डाबकी रस्त्यावरील उगलेवाडी येथे हे भवन साकारण्यात
आले असून, यासाठी बचत गटातील महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. हा प्रकल्प इतर जिल्ह्यांसाठी
आणि विभागांसाठी एक 'रोल मॉडेल' ठरत आहे.
अकोला जिल्हा हा प्रामुख्याने
तूर, सोयाबीन आणि कपाशी या पिकांसाठी ओळखला जातो. बचत गट, साधन केंद्रे यांच्या माध्यमातून
या प्रमुख पिकांवर आधारित कृषी प्रक्रिया उद्योगांचे (Agro-Processing units)
जाळे विणण्याचे नियोजन आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया करून तो थेट बाजारात विक्रीसाठी
उपलब्ध करून देणे,केवळ शेतीच नव्हे, तर इतर व्यावसायिक उपक्रमांची जोड देऊन महिलांना
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, असे नियोजन आहे असे व्यवस्थापक सोनाली अंबरते यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे,महिला बचत गटांना मुख्य प्रवाहातील
व्यवसायाशी जोडण्यासाठी आता 'महाबीज'सारख्या (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) संस्थांसोबतही
काम करण्याचे नियोजन आहे. बीजोत्पादन कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांवर बचत गटांच्या
महिलांना सहभागी करून घेतल्यास, त्यांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ आणि अधिक उत्पन्न
मिळणे शक्य होणार आहे. अशा विकासाच्या अनेक शक्याशक्यता धुंडाळून केंद्र पुढे पावले
टाकत आहे.
माविमच्या सुवर्णमहोत्सवी
वर्षात महिलांनी स्वतःच्या हिंमतीवर ही वास्तू उभी करून आपण कोणावरही अवलंबून नसल्याचे
सिद्ध केले आहे. 'तेजस्विनी भवन' ही वास्तू महिलांच्या संघशक्तीचा विजय आहे. शेतीपूरक
व्यवसायांसोबतच आधुनिक उद्योगांची जोड मिळाल्यास, अकोल्यातील या उपक्रमातून महाराष्ट्रात
महिला आर्थिक सक्षमीकरणाची एक नवी लाट येईल, यात शंका नाही.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा