जननी शिशु सुरक्षा योजनेचा १७ हजार ७२६ महिलांना लाभ

 

 

 जननी शिशु सुरक्षा योजनेचा १७ हजार ७२६ महिलांना लाभ

 

अकोला, दि. १६ : जननी शिशु सुरक्षा योजनेत यंदा जिल्ह्यातील १७ हजार ७२६ महिलांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य यंत्रणेतर्फे देण्यात आली.

जननी शिशु सुरक्षा योजनेत गर्भवती महिलांना आणि त्यांच्या नवजात बालकांना मोफत आणि सुरक्षित प्रसूती सेवा पुरविली जाते. यामध्ये मोफत वाहतूक, औषधोपचार, निदान, रक्त आणि आहार यांचा  समावेश आहे. सन २०२५-२६ मध्ये १७ हजार ७२६ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे.

 

त्याचप्रमाणे, जननी सुरक्षा योजनेमध्ये एस.सी., एस.टी., बीपीएलधारक लाभार्थी यांना प्रसूतीनंतर सात दिवसात सातशे रुपये दिले जातात. खाजगी रुग्णालयात सिजर झाले तर २ हजार २०० रुपये दिले जातात. सन २०२५-२६ मध्ये  २ हजार ४१२   लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे.

 

 

माता-मृत्यूदर व अर्भक मृत्यूदर कमी करणे हे कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. राज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण चांगले आहे. शासकीय संस्थांमध्ये प्रसूत होणा-या मातांना औषधे, विविध तपासण्या, प्रसंगी सिझेरियन इत्यादीसाठी लागणारी साहित्य बाहेरुन खरेदी करण्यासाठी तसेच मातेला संदर्भित केल्यानंतर आवश्यक त्या वाहनाची सोय करणे यासाठी संबंधित मातेला किंवा तिच्या कुटूंबियांना खर्च करावा लागतो. पैशाअभावी यामध्ये होणा-या विलंबामुळे प्रसंगी माता-मृत्यू अथवा अर्भक मृत्यू होण्याची संभावना जास्त असते.  वरील प्रमाणे होणारे माता-मृत्यू अथवा अर्भक मृत्यू कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यामध्ये कार्यवाही करण्यात येत आहे.

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमात विनामूल्य औषधे व इतर साहित्यपुरवठा, विनामूल्य संदर्भ सेवा, आहार आदी सुविधा दिल्या जातात. उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा व स्त्री रुग्णालय व इतर शासकिय आरोग्य संस्थांमध्ये सुविधा दिल्या जातात.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा