नागरिकांना जनगणनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागाची संधी; स्वगणनेची सुविधा जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 स्वगणना लिंक: se.census@gov.in



 नागरिकांना जनगणनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागाची संधी; स्वगणनेची सुविधा

 जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन




अकोला, दि. १७ : भारत सरकारकडून यंदा देशाची 16 वी जनगणना राबवली जात आहे. ही जनगणना विशेष आहे कारण यावेळी 'डिजिटल सेन्सस' आणि 'स्व-गणना' ही सुविधा पहिल्यांदाच दिली जात आहे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना सुविधेचा लाभ घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज केले.

 स्व-गणना म्हणजे काय?  आपण स्वतः आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून जनगणनेच्या पोर्टलवर आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरू शकतो. यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर यापैकी एकाच्या आधारे लॉगिन करावे लागेल. स्व-गणना कालावधी हा दिनांक 01 मे 2026 ते दिनांक 15 मे 2026 असा आहे, ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय आहे.

अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, विशेषतः तरुण, शिक्षित बांधवांनी पुढाकार घेऊन स्वतःची व आपल्या कुटुंबाची माहिती स्व-गणनेद्वारे भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

सामान्य नागरिकांना स्व-गणना करुन जनगणनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता येणे शक्य होईल.

जनगणनेच्या कार्याकरिता अकोला जिल्हयातील ग्रामीण व नगरपरिषद शहरी क्षेत्रात एकुण 2 हजार 338 घरयादी गट बनविण्यात आले असुन एक घरयादी गट हा जवळपास 180-200 घरे किंवा 650 ते 800 लोकसंख्येपासुन तयार केला जातो. याकरिता एकुण 2 हजार 614 प्रगणक तसेच प्रत्येक 6 प्रगणकांकरिता 1 याप्रमाणे एकूण 426 पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दिनांक 23 एप्रिलपासून दिनांक 8 मे  या कालावधीत चार्ज अधिकारी स्तरावर घेण्यात येणार आहे.

जे नागरिक तंत्रज्ञान वापरू शकत नाहीत, ज्येष्ठ नागरिक, किंवा ज्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांच्यासाठी प्रशिक्षित प्रगणक दिनांक 16 मे ते दि  14 जुन या कालावधीत प्रत्येक घरी भेट देऊन अॅप‌द्वारे माहिती नोंदवतील.

 जनगणनेतून मिळालेली आकडेवारी पुढील 10 वर्षांसाठी शाळा, दवाखाने, रस्ते, रेशन, पाणीपुरवठा, रोजगार योजना यांचे नियोजन ठरवते. तुमची एक अचूक नोंद म्हणजे अकोला जिल्ह्याच्या विकासाला हातभार आहे.
तेव्हा 01 मे 2026 पासून सुरू होणाऱ्या स्व-गणना टप्प्यात सहभागी व्हा. काही अडचण आल्यास आपले तालुक्यातील तहसिल कार्यालय तसेच नगरपरिषद/नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा, असे  त्यांनी सांगितले.

 सर्वानी जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवुन जनगणनेतुन जनकल्याण हे ब्रीद सार्थ ठरवु या व अकोला जिल्ह्याची जनगणना 100 टक्के यशस्वी करूया, असे आवाहन त्यांनी केले.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा