आमची जनगणना, आमचा विकास पहिल्या टप्प्यात स्वगणनेला १ मेपासून प्रारंभ

 

आमची जनगणना, आमचा विकास

पहिल्या टप्प्यात स्वगणनेला १ मेपासून प्रारंभ

अकोला, दि. २३ :  देशभरात राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाची सुरूवात होत असून, पहिला टप्प्यात स्वगणना १ मे  ते १५ मे दरम्यान होणार आहे. स्वगणनेद्वारे नागरिक आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन भरू शकतात. अधिकाधिक नागरिकांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.  

          स्वगणनेची सुविधेमुळे नागरिकांना स्वत: माहिती भरता येणे शक्य आहे. प्रत्यक्ष घर गणना प्रगणकाद्वारे१६ मे  ते १४ जून दरम्यान होणार आहे.  

 

 स्व-गणना प्रक्रिया

ऑनलाईन नोंदणीचे टप्पे: https://se.census.gov.in  या अधिकृत पोर्टलवर जा. कुटुंब प्रमुखाचे नाव आणि १० अंकी मोबाईल क्रमांक नोंदवून ओटीपीद्वारे लॉग-इन करा. आपला जिल्हा, पिन कोड आणि गावाचे नाव निवडा. गुगल मॅपवर आपल्या राहण्याचे ठिकाण निश्चित करा. विचारलेल्या ३३ प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निवडा. माहितीची खात्री करून 'फायनल सबमिशन' करा. त्यानंतर आपल्याला ११ अंकी एसई आयडी प्राप्त होईल. हा एसई आयडी जपून ठेवा. जेव्हा प्रगणक तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दाखवणे आवश्यक आहे.

 

जनगणनेमध्ये इमारत व घर क्रमांक, घराची स्थिती, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग आणि प्रवर्ग. राहण्याच्या खोल्यांची संख्या आणि विवाहित जोडप्यांची संख्या, उपलब्ध सोयी-सुविधा, मालमत्ता, साहित्य आदी माहिती विचारली जाते.   

स्व-गणना करणे ही एक विशेष डिजिटल सुविधा आहे जी आपला वेळ वाचवते. जर आपण स्व-गणना करू शकला नाही, तरी काळजी करू नका; प्रगणक निश्चित कालावधीत आपल्या घरी भेट देतील. तुमची सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवली जाईल. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा