अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 ते 8 एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 ते 8 एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’
अकोला, दि. १ : भारत सरकार, क्षमता विकास
आयोग (CBC) आणि कर्मयोगी
भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत
साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय
आपल्या कामकाजात करुन त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.
केंद्र शासनाने साधना सप्ताह उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना
दिल्यानंतर आता राज्यातही महा-साधना सप्ताह 2 ते 8 एप्रिल या काळात आयोजित करण्यात आला आहे. टेक
लर्निंग वीक अंतर्गत 8 लाख 80 हजारांहून अधिकारी आणि कर्मचारी 7 दिवसांत किमान 4 तासांचे
अभ्यासक्रम आय गॉट कर्मयोगी भारत
पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करणार आहेत. यामुळे जवळपास 35 लाखांहून अधिक
वेळ अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळे अभ्यासक्रम
शिकतील.
साधना सप्ताह हा आयगॉट कर्मयोगी भारत अंतर्गत राबविला जाणारा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हा उपक्रम मिशन कर्मयोगीचा एक भाग असून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्टया सक्षम करण्यासाठी आयोजित केला जातो. एक आठवडाभर आयोजित केला जाणारा हा उपक्रम पूर्णपणे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या स्वत:च्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज सुकर होण्याच्या पध्दती शिकतात. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे, डिजिटल गव्हर्नन्स आणि नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, सतत शिक्षण घेत राहणे,वेळ व्यवस्थापन ही सप्ताह आयोजित करण्यामागची मुख्य उद्दिष्टे असल्याने या सप्ताहात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा