पनीर खाताय? ते दुधाचे आहे का ते तपासा
पनीर खाताय? ते दुधाचे
आहे का ते तपासा
अकोला, दि. २२ : काही
उपाहारगृहे, खाद्यगृहे आदी आस्थापनांत पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉग प्रकारातील पदार्थ
दिला जाऊ शकतो. पनीर दुधाचे आहे का ते तपासणे आवश्यक आहे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे
करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा व मानके
कायदा, २००६ हा जाहिरात व जनजागृती यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कायदा असून सर्वसामान्य
जनतेस सकस, निर्भय व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा त्याचा प्रमुख उद्देश
आहे.भारत हा दुग्ध उत्पादनात अग्रगण्य देश असून पनीर हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा
घटक आहे. पनीर केवळ चविष्ट नसून पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे त्याचे आहारात विशेष
स्थान आहे. पनीरमध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणात
आढळतात. शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो.
पनीर व चीज अॅनालॉगमध्ये
मूलभूत फरक :
अन्न सुरक्षा व मानके (अन्नपदार्थ मानके व अॅडिटिव्ह नियम), २०११ मधील नियम २.१.११
नुसार "पनीर" हे केवळ दुधापासून बनविलेले पदार्थ आहे. परंतु "चीज अॅनालॉग"
हा दूध व्यतिरिक्त इतर खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर व इतर घटक वापरून बनविलेला पदार्थ
असून तो पनीरसारखा दिसतो पण "पनीर" नाही. एफएसएसएआयच्या मानकांनुसार हा
"चीज अॅनालॉग" या प्रकारात मोडतो.
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र
राज्य यांच्या निदर्शनास आले आहे की काही रेस्टॉरंट/केटरर्स/हॉटेल्स/फास्ट फूड विक्रेते
या आस्थापनांमध्ये अन्न पदार्थ तयार करताना चीज अॅनालॉगचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात
येत असून याबाबत सदर आस्थापनांकडून ग्राहकांना पुरेशी माहिती उपलब्ध करून देण्यात येत
नसल्यामुळे ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याचे आढळून आले आहे. तसेच बाजारात
काही ठिकाणी "नॉन डेअरी चीज", "चीज अॅनालॉग", "व्हेज चीज
पदार्थ" किंवा "चीज" या नावाने किंवा तत्सम नावाने विक्री केली जात
आहे, ज्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत आहे.
अन्न सुरक्षा व मानके
कायद्यातील तरतुदी :
अन्न सुरक्षा व मानके
कायदा २००६ चे कलम १८ (२) (ई) नुसार उपभोक्त्यांना ते जे अन्न खातात त्याबद्दल योग्य
निर्णय घेण्यासाठी अन्न पदार्थांबाबत माहिती असणे आवश्यक आहे. तसेच अन्न सुरक्षा मानके
(Labelling and Display Regulation) २०२० मधील chapter ३ मधील नियम २(ई) नुसार अन्न
पदार्थांची ग्राहकांना विक्री करताना, पोषण संबंधित माहिती आणि त्यातील घटकांची माहिती,
तसेच आरोग्य संदर्भात प्रकटन करणे आवश्यक आहे.
राज्य परवानाधारक चीज
अॅनालॉगचे उत्पादक/पुरवठादार यांनी चीज अॅनालॉग विक्री/पुरवठा करताना Food Safety
and Standards Act, 2006 च्या कलम २३ मधील तरतुदीनुसार अन्नपदार्थाचे पॅकेजिंग व लेबलिंग
करताना ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच Food
Safety and Standards (Labelling and Display) Regulations, 2020 (General
Labelling Requirements) नुसार विक्री केले जाणारे चीज अॅनालॉग हे स्पष्टपणे दर्शविणे
बंधनकारक आहे. रेस्टॉरंट/हॉटेल्स/केटरर्स/फास्ट फूड विक्रेते या आस्थापनांनी जर चीज
अॅनालॉग वापर करून अन्न पदार्थ तयार केले असतील तर त्याची विक्री करताना त्याबाबत स्पष्ट
माहिती देणे आवश्यक आहे.
करताना मेन्युफॅक्चर/इलेक्ट्रॉनिक
डिस्प्ले बोर्ड इत्यादी वर सदर अन्न पदार्थ स्पष्टपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
ग्राहकांनी घ्यावयाची
काळजी :
१. पनीर खरेदी करताना
पॅकेज उत्पादनावरील लेबल काळजीपूर्वक तपासावे.
२. रेस्टॉरंटमध्ये पनीर खरेदी करताना विक्रेत्याकडे ते शुद्ध दुधापासून बनवलेले आहे
का याची खात्री करावी. तसे नसल्यास टाळावे.
३. हॉटेलमधील मेनूकार्डवर पनीर व चीज अॅनालॉग हे दोन स्वतंत्र अन्न पदार्थ आहेत का
याची खात्री करावी व त्याप्रमाणेच आवश्यक माहिती घेऊनच पदार्थ निवडावा.
४. अॅनालॉग हा आरोग्यास अपायकारक नसला तरी त्यातील घटक व पोषणमूल्ये पनीरपेक्षा वेगळी
असतात. त्यामुळे ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी योग्य माहिती असणे आवश्यक आहे.
अन्न व्यवसायिकांना
निर्देश :
राज्यातील रेस्टॉरंट/केटरर्स/हॉटेल्स/फास्ट
फूड विक्रेते/चीज अॅनालॉगचे उत्पादक/पुरवठादार यांनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन
केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, नियम व विनियम अंतर्गत
कठोर कारवाई करण्यात येईल.
हॉटेल/रेस्टॉरंट चालकांनी
पनीर अॅनालॉग व चीज अॅनालॉग उत्पादनांचा वापर करून तयार केलेल्या पदार्थांची विक्री
करताना सदर अन्न पदार्थाचे स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे.
ज्या अन्न व्यवसायिकांनी
अन्न परवाना घेतला त्यावेळी त्यांनी जो मोबाईल/फोन संपर्क क्रमांक दिलेला आहे, त्या
क्रमांकावर प्रशासनाकडून हॉटेल/रेस्टॉरंट चालकांना पनीर व चीज अॅनालॉग संदर्भात उपरोक्त
नमूद करावयाचे कार्यवाही संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तसेच, ज्या अन्न व्यवसायिकांनी
परवाना घेताना स्वतःचा ई-मेल आणि मोबाईल क्रमांक दिलेला नाही व कोणत्या अन्य व्यक्तीचा
मेलआयडी आणि मोबाईल नंबर दिलेला आहे, अशा अन्न व्यवसायिकांना स्पष्ट सूचना देण्यात
येत आहे की त्यांनी तात्काळ आपल्या परवाना नोंदणीमध्ये स्वतःचा मेलआयडी आणि मोबाईल
नंबर टाकावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन ग्राहकांच्या
आरोग्याबाबत दक्ष असून अन्नातील भेसळ व दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी
कटिबद्ध आहे.
ग्राहकांनी अशा प्रकारची
दिशाभूल झाल्यास त्याबाबत तक्रार प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर
नोंदवावी असे आवाहन अन्न सुरक्षा आयुक्त श्री. श्रीधर डुबे-पाटील यांनी जनतेस केले
आहे.
००००
टोलफ्री- एकआठशून्यशून्यदोनदोनदोनतीनसहापाच
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा