सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी संविधान हा देशाच्या सुदृढ लोकशाहीचा पाया जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे प्रतिपादन
सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
संविधान हा देशाच्या सुदृढ लोकशाहीचा पाया
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे प्रतिपादन
अकोला, दि. १४ : भारतीय संविधान हे देशाच्या एकता व अखंडतेचा पाया असून सक्षम व सुदृढ लोकशाही निर्माण करण्याचे कार्य भारतीय संविधानाने केले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने ८ ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमात त्या बोलत होत्या. समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मारुती वाठ, जिल्हा जात पडताळणी उपआयुक्त अमोल यावलीकर, व्याख्यात्या राजेश्वरी सोळंके यांच्यासह सामाजिक न्याय विभाग पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी आदी उपस्थित होते.
श्रीमती मीना म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यांनी देशाला संपूर्ण जगाला आदर्शवत अशी राज्यघटना दिली. त्यांचे लेखनकार्य व विचार संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने वाटचाल केली पाहिजे.
यावेळी इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. अनु. जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार खून किंवा मृत्यू झालेल्या दिवंगत व्यक्तीच्या वारसाला नोकरी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार पात्र व्यक्तींना नियुक्तीपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. विविध पुरस्कारांचे वितरणही यावेळी झाले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा