सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक शिबिरे घेऊन प्राप्त अर्जांचा आठवड्यात निपटारा करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आदेश

 सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

शिबिरे घेऊन प्राप्त अर्जांचा आठवड्यात निपटारा करा

-        जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आदेश

अकोला, दि. २० : सेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित सेवा नागरिकांना कालमर्यादेत पुरविणे आवश्यक आहे. त्यात एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये. सर्व यंत्रणांनी शिबिर स्तरावर काम करून आठवडाभरात सर्व अर्जांचा निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

सेवा हक्क अधिनियमानुसार प्राप्त अर्जांवर विविध यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, अधिनियमानुसार  कालमर्यादा लक्षात घेऊन अर्जांचे निराकरण व्हावे. या बाबीचा विभागप्रमुखांनी आपल्या विभागात प्रत्येक तालुक्यात आढावा घ्यावा. शिबिरांचे आयोजन करून आठवडाभरात सर्व अर्ज निकाली काढा. एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये. चांगला परफॉर्मन्स असलेल्या कार्यालयाला गौरविण्यात येईल. पारदर्शकता, उत्तरदायित्व, कालबद्धता व कार्यक्षमता यांचा अवलंब करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचे आवाहन त्यांनी केले.

लोकसेवा हक्क दिन दि. २८ एप्रिल रोजी साजरा केला जाईल.  अधिनियमाच्या अनुषंगाने कार्यालयांनी केलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा घेतला जाईल. बैठकीला अनुपस्थित राहणा-या यंत्रणाप्रमुखांना ‘कारणे दाखवा’ नोटीस दाखविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

 

भारत सरकारकडून यंदा देशाची 16 वी जनगणना राबवली जात आहे. त्यात 'डिजिटल सेन्सस' आणि 'स्व-गणना' ही सुविधा देण्यात आली. सर्व यंत्रणांनी स्वगणना सुविधेबाबत जनजागृती व राष्ट्रीय जनगणनेच्या कार्यात योगदान देण्याचे आवाहन श्रीमती मीना यांनी केले.

०००



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना