नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 'कृषी अवजार बँक' : बचत गटांनी २५ एप्रिलपूर्वी अर्ज करावा आत्मा प्रकल्प संचालकांचे आवाहन

 > नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

'कृषी अवजार बँक' : बचत गटांनी २५ एप्रिलपूर्वी अर्ज करावा

आत्मा प्रकल्प संचालकांचे आवाहन

अकोला, दि. 13 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांना कृषी व्यवसायात भरारी घेण्याकरिता अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेतून गावपातळीवर 'कृषी अवजार बँक' स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्यांच्या ६० टक्क्यांपर्यंत, कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी प्रकल्प गावातील उमेद, माविम पुरस्कृत व इतरमहिला बचत गट तसेच महिलांचे गाव संघ पात्र राहतील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान १० सदस्य असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला आहे, त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. एका गावात एकाच महिला गटाला लाभ देता येईल. त्यामुळे जर एकाच गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर लाभार्थीची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. प्रकल्पाचे मूल्य २० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, राष्ट्रीयकृत बँकेकडून ७५ टक्के कर्ज घेणे बंधनकारक आहे.

निवड झालेल्या गटांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाइन हार्वेस्टर आणि फवारणी पंप यांसारखी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करता येईल. इच्छुक महिला गटांनी प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर- https://dbt-ndksp.mahapocra.gov.in  - दि. २५ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी प्रकल्प गावातील समूह सहायक व स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आत्मा कार्यालयाचे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा