वातावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यासाठी कृषी पदवीधरांनी संशोधनाला चालना द्यावी - - राज्यपाल रमेश बैस











डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 वा दीक्षांत समारंभ

वातावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यासाठी

कृषी पदवीधरांनी संशोधनाला चालना द्यावी

-          

-         राज्यपाल रमेश बैस

अकोला, दि. 14 : जलवायू परिवर्तन व वातावरणातील बदलांचे आव्हान कृषी क्षेत्रापुढे उभे ठाकले आहे.  त्यावर मात करण्यासाठी व त्याला अनुकूल पीकपद्धती निर्माण करण्यासाठी कृषी पदवीधरांनी संशोधनाला चालना द्यावी, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली आज दीक्षांत सभागृहात झाला. राज्यपाल श्री. बैस, तसेच विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे समारंभाला ऑनलाईन उपस्थित होते. नवसारी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. झेड. पी. पटेल, कुलगुरू डॉ. शरद गडाख, कार्यकारी परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता व अनेक मान्यवर उपस्थित होते.

 राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, वातावरणातील बदलाला अनुकूल पीकपद्धती निर्माण करणे ही आजची गरज आहे. पुढील काळात शेती क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कृषी विद्यापीठ व कृषी पदवीधरांनी व्यापक संशोधन करावे. कृषी तज्ज्ञ एम. एस. स्वामीनाथन आणि विविध संशोधकांनी देशात हरितक्रांती घडवून आणली. त्यामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. आता आपला देश विकसित होण्याकडे वाटचाल करत आहे. या प्रक्रियेत पदवीधरांनी योगदान द्यावे. कृषी विद्यापीठाचे कृषी शिक्षण व विस्तार शिक्षणातील कार्य महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले की,  बदलती नैसर्गिक परिस्थिती शेती क्षेत्रापुढे संकट म्हणून उभी आहे. कृषी पदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा वापर व विविध प्रकारचे संशोधन करून या संकटाचे संधीत रूपांतर करावे. बदलत्या परिस्थितीतही तग धरू शकतील व कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पादन देऊ शकतील अशा पिकांच्या जाती विकसित व्हाव्यात. आपल्या ज्ञानाचा फायदा शेती व शेतकरी बांधवांसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नवसारी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पटेल म्हणाले की, शेती क्षेत्राचे बळकटीकरण, उत्पादकता वाढीच्या दृष्टीने विविध साधननिर्मितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व ड्रोन तंत्रज्ञान उपकारक ठरत आहे. त्याचा उपयोग शेती क्षेत्रासाठीच्या पीक विमा योजना, कृषी विकास योजना अशा योजनांसाठीही होत आहे. असे नवनवे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी वेळोवळी आत्मसात करावे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. गडाख यांनी अहवालवाचन केले. समारंभाद्वारे  4 हजार 40 स्नातक पदवीधर झाले. 36 स्नातकांना आचार्य पदवी प्रदान व पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखेच्या 369 स्नातकांना पदवी  प्रदान करण्यात आली. गुणवंतांना विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले.

०००

 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ