जिल्हा कोषागारात ई- बिलिंग प्रणालीचा शुभारंभ


 जिल्हा कोषागारात ई- बिलिंग प्रणालीचा शुभारंभ

गझल नवाज भीमराव पांचाळे यांची उपस्थिती

अकोला, दि. 1 : कोषागारदिनानिमित्त येथील जिल्हा कोषागारात ई- बिलिंग, ई- टपाल व ई- चलान सेवेचा शुभारंभ गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज झाला. अचूकता, पारदर्शकता व गतिमान प्रशासनासाठी ई- प्रणालीचा वापर उपयुक्त ठरेल, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

कोषागारदिनानिमित्त कोषागारात आयोजित या कार्यक्रमाला गझलनवाज श्री. पांचाळे हे माजी बँकर असल्याने त्यांना आवर्जून या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले होते. जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे लेखा नियंत्रण अधिकारी प्रमोद पाटील, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, लेखाधिकारी श्री. पुंडकर, श्री. कराळे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. पांचाळे म्हणाले की, कोषागारदिनानिमित्त आज प्रणालीचा शुभारंभ व अधिकारी, तसेच कर्मचा-यांचा स्नेहमेळावा होत आहे, ही आनंदाची बाब आहे. विविध जबाबदा-या पार पाडताना कला, संगीत, छंदासाठीही दोन क्षण मिळावेत ही प्रत्येकाचीच गरज असते. कामातून निर्माण होणा-या तणावांचे निरसन करण्यासाठी व कार्यक्षमता वाढविण्यासाठी ते आवश्यक असते. श्री. पांचाळे यांनी यावेळी गझलेचे काही तुकडे गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. श्री. पाटील, श्री. पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रणालीमुळे कार्यवाहीला गती मिळेल

श्री. गोरेगावकर म्हणाले की, कार्यालयाकडून देयक ऑनलाईन प्रणालीद्वारे सरळ जिल्हा कोषागार कार्यालयात सादर होणार आहे, प्रत्यक्ष मेसेंजरद्वारा कोषागारात देयक काऊंटरवर सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही , यामुळे वेळेची व मनुष्यबळाची बचत होईल. ही देयके ऑनलाइन कोषागारात प्राप्त झाल्यानंतर त्यावर कार्यवाही होऊन ई-कुबेर प्रणालीद्वारे देयक कार्यालयप्रमुखाच्या बँक खात्यात वीस ते तीस मिनिटांच्या कालावधीत जमा होईल.

ई-टपाल प्रणालीद्वारे कोषागारात प्राप्त पेन्शन प्रदान आदेश व विविध विभागांकडे अनुदानाचे आदेश यांचे संगणकीकृत एकत्रीकरण कार्यवाहीला गती मिळेल. शासनाचे विविध महसूल गोळा करणारे विभाग जसे जीएसटी विभाग, उत्पादन शुल्क विभाग , परिवहन विभाग व जमीन खरेदी व नोंदणी विभाग त्यांच्याद्वारे शासनास प्राप्त महसुलाची प्राप्त रक्कम  ई-चलान प्रणाली द्वारे ऑनलाइन जमा होऊन दिवसनिहाय संकलन जिल्हा कोषागारात त्याच दिवशी करणे शक्य होईल, यामुळे शासनास प्रत्येक दिवशी व त्या त्या महिन्यात प्राप्त महसुलाची आकडेवारी तात्काळ प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले.

  ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ