शहरात 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा - जिल्हाधिकारी अजित कुंभार




शहरात 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा

- जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 22 : अकोला जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार लोकसहभागातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीसाठी पहिली  ‘फिट अकोला’ हाफ मॅराथॉन स्पर्धा दि. 10 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. हाफ मॅराथॉन अकोल्यात प्रथमत:च होत असून, अकोलेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. 

जिल्हाधिका-यांच्या संकल्पनेतून विविध संस्थांचे सहकार्य व लोकसहभाग मिळवून हा उपक्रम घेण्यात येत आहे. त्याची माहिती देण्यासाठी नियोजनभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या उपक्रमाचे रेस डायरेक्टर तथा इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार सोनोने, सिमरनजीतसिंह नागरा, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नयन सिन्हा, शाश्वत कदम, स्टेट बँक ऑफ इंडियेच्या मंजुषा जोशी, राजेंद्र सुरवसे व अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, पर्यटन व नागरिकांमध्ये फिटनेसबाबत जागृतीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्पर्धा 21 किलोमीटर, 10 किमी व 5 किमी या तीन प्रकारांत होणार आहे. 21 किलोमीटर इतक्या लांबीच्या मॅराथॉनचे अकोल्यात पहिल्यांदाच आयोजन होणार आहे. भविष्यात 42 किमी लांबीची पूर्ण मॅराथॉनही आयोजित करण्याचाही मानस आहे. अनेक खेळाडू, नागरिक या उपक्रमात सहभागी होणार असून, ‘फिट अकोला’ या उपक्रमाची सर्वदूर ओळख निर्माण होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 18 ते 45 वयोगटातील व त्यावरील वयाच्या व्यक्तींना त्यात सहभागी होता येईल. अशा स्पर्धेत प्रवेशासाठी किमान वय आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन 21 किमीसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे, 10 किमीसाठी किमान 16 वर्षे आणि 5 किमीसाठी 12 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

स्पर्धेत 18 ते 45, तसेच 45 वर्षांवरील असे वेगळे गट असून, स्वतंत्र तीन बक्षीसे देण्यात येतील. त्याचप्रमाणे, 21 किमी स्पर्धेतील पुरूष व महिला गटातील पहिल्या तीन विजेत्यांना 21 हजार, 15 हजार व 11 हजार रू. अशी तीन बक्षीसे देण्यात येतील.   त्याचप्रमाणे, 21 किमी अंतर पूर्ण करणा-या सहभागींना इलेक्ट्रॉनिक चिपसह बिब, तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र, टी शर्ट, मेडल देण्यात येणार आहे. 10 किमी अंतराच्या स्पर्धेत 16 ते 45 वयोगटातील पुरूष व महिला सहभागींसाठी, तसेच 5 किमी  अंतराच्या स्पर्धेत 12 ते 18 वयोगटातील सहभागींना प्रत्येकी 10 उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत. एकूण चाळीसहून अधिक आकर्षक बक्षीसेही असतील. प्रत्येक विहित अंतर पूर्ण करणा-या सहभागींना मेडल देण्यात येईल.  

वसंत देसाई क्रीडांगण येथून स्पर्धेला सुरुवात होईल. पुढे ती दुर्गा चौक, नेहरू पार्क चौक, संत तुकाराम चौक, अशोक वाटिका मार्गे पुन्हा वसंत देसाई क्रीडांगण येथे येऊन थांबेल.  

उपक्रमात प्रवेश विनामू्ल्य असून, सर्व सहभागींना टी-शर्ट देण्यात येईल, तसेच ‘मिलेट इयर’च्या पार्श्वभूमीवर मिलेटपासून तयार केलेल्या अल्पोपहाराची व्यवस्था असेल. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, जसनागरा पब्लिक स्कूल, बँक ऑफ महाराष्ट्र यांचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले आहे. उपक्रमात स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य, तसेच अधिकाधिक लोकसहभाग मिळविण्यात येत आहे. उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठीही विविध प्रयत्न होत आहेत, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी 7709316252 किंवा 7020104675 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. नोंदणीसाठी लिंक : bit.ly/FITAKOLA2024  

00000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ