आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट
आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट
अकोला, दि. 31 : वाहनांवरील नंबरप्लेटमध्ये छेडछाड, बनावट प्लेट आदी
प्रकारांना आळा घालण्यासाठी आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट
बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. वाहनधारकांनी संबंधित पोर्टलवर बुकिंग करून नंबरप्लेट
बसवून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी केले आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 अन्वये शासनाकडून सर्व
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतूद करण्यात
आली आहे. वाहनांना नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे,
रस्त्यावर धावणा-या वाहनांची ओळख पटविणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून
सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले
आहेत.
अकोला जिल्ह्यासाठी या कामासाठी मेसर्स एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स प्रा.
लि. ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. नंबरप्लेटच्या बुकिंगसाठी https://maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित
करण्यात आले आहे. वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉईंटमेंट
घेऊन नंबरप्लेट बसवून घ्यावी.
वाहनधारक अकोला कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरीही काही कामानिमित्त
अकोल्यात वाहन वापरत असेल तरीदेखील त्याला ही प्लेट बसविणे आवश्यक आहे.
एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याचे दर
एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याचे दर निश्चित करून देण्यात आले आहेत. त्यानुसार
जीएसटी वगळून शुल्क दुचाकी वाहने व ट्रॅक्टरसाठी 450 रू., तीनचाकीसाठी 450 रू., इतर
सर्व वाहनांसाठी 745 रू. इतके असेल.
वाहनधारकांना नंबरप्लेट बसविण्याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित पोर्टलवर
किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार करता येईल.
नंबरप्लेट न बसविल्यास दंडात्मक कारवाई
नागरिकांनी वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट न बसविल्यास वाहनांचे मालकी
हक्क हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्ययावत
करणे आदी कामकाज थांबविण्यात येईल. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी
नंबरप्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर भविष्यात दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा
इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिला आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा