कृषी स्वावलंबन व कृषी क्रांती योजना वाढीव अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन
कृषी स्वावलंबन व कृषी क्रांती योजना
वाढीव अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन
अकोला, दि. 11 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतक-यांना नविन विहीर बांधकाम, जुनी विहीर दुरूस्ती व इतर बाबींसाठी अनुदान दिले जाते. अनुदानात शासनाने वाढ केली असून, वाढीव अनुदानाचा पात्र शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ अनुसुचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना देय आहे.
असे मिळते अनुदान
या योजनांद्वारे नवीन विहिर दुरूस्तीसाठी चार लाख, जुनी विहिर दुरुस्तीसाठी एक लाख अनुदान मिळते. डिझेल पंप संचासाठी 40 हजार रू., वीज जोडणी आकार 20 हजार रू., शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 2 लाख रू. पर्यंत, ठिबक सिंचन संचासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के किंवा 97 हजार रू., तुषार सिंचन संचासाठी 47 हजार रू. अनुदान मिळते.
सोलर पंपासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के किंवा 50 हजार रू., पीव्हीसी, एचडीपीई पाईपसाठी 50 हजार रू. पर्यंत, तुषार संच पूरक अनुदान 47 हजार रू., ठिबक सिंचन संच पूरक अनुदान 97 हजार रू., परसबागेसाठी पाच हजार रू., व बैलचलित किंवा ट्रॅक्टरचलित अवजारे, यंत्रसामग्रीसाठी 50 हजार रू. अनुदान मिळते.
आवश्यक कागदपत्रे
जातीचा दाखला, लाभार्थी शेतक-याकडे किमान 0.40 हेक्टर ते कमाल 6 हे., लाभार्थीच्या नावे सातबारा उतारे, आठ अचा उतारा, विहिर सामाईक असल्यास सर्व खातेदारांचे तहसीलदारांचे समक्ष 500 रू. स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड व आधार जोडणी असलेले बँक खाते पुस्तक, पंपसंचासाठी वीज जोडणी कोटेशन किंवा बिल भरणा पावती आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. इच्छूकांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. अधिक माहिती पंचायत समितीत कृषी अधिका-यांकडे मिळू शकेल.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा