सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच निवडणूक प्रक्रिया पूर्ण पाचही मतदारसंघांत उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष व्हीव्हीपॅट स्लीप मोजणी पूर्ण
अकोला, दि. 12 ; जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक बाबीचे काटेकोर पालन करत मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पाचही मतदारसंघातील 25 मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट स्लीपची मोजणी उमेदवारांच्या प्रतिनिधीसमक्ष करण्यात आली आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तसा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले.
उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष होते प्रत्येक प्रक्रिया पूर्ण
> ईव्हीएम यंत्रांच्या प्रथमस्तरीय तपासणीपासून ते मतदान होऊन यंत्रे सीलबंद करून स्ट्राँगरूममध्ये जमा होण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावरील प्रक्रिया राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष पू्र्ण केली जाते. त्यामुळे हस्तक्षेपाला किंवा फेरफार करण्यास कुठेही वाव नसतो. नियमांचे काटेकोर पालन करूनच ही प्रक्रिया पूर्ण होते.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या क्रमांकामधून लॉटरी पध्दतीने निवडलेल्या 5 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिन्सच्या स्लीप्सची मोजणी बंधनकारक आहे. या प्रक्रियेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. ईव्हीएममधील प्रत्येक उमेदवाराच्या मतसंख्येशी व्हीव्हीपॅट स्लीप्सची संख्या पडताळणे हा ह्या प्रक्रियेचा उद्देश आहे.
सरमिसळीकरणाद्वारे मतदान केंद्रांची निवड; व्हीव्हीपॅट स्लीपची मोजणी
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणीच्या वेळेस जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये एकूण 25 व्हीव्हीपॅटमधील स्लीप्सची अनिवार्य मोजणी दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 5 मतदान केंद्रांच्या क्रमांकाची सरमिसळ करून भारत निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या समोर आणि उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रे निवडण्यात आली. या केंद्रांतील मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही.
ही प्रक्रिया प्रत्येक मतमोजणी केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोरच पार पडलेली असल्याने, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या दस्तऐवजांवरही या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
व्हीव्हीपॅट स्लीप्सच्या मोजणीच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी, प्रत्येक मतमोजणी केंद्रावर विशेष सुरक्षेची काळजी घेऊन स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला होता, आणि या संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटिव्ही कव्हरेज तसेच चित्रिकरण करण्यात येऊन ते जतन केले गेले आहे.
मतमोजणीच्या संदर्भातील भारत निवडणूक आयोगाच्या विहित प्रक्रियेनुसार व्हीव्हीपॅट स्लीपची गणना पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तसेच विजयी उमेदवार जाहीर करता येत नाही. त्यानुसार जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये याबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा