बचत गटांतील महिलांच्या योगदानातून उभारणी; ‘तेजस्विनीभवना’चे लोकार्पण
बचत गटांतील महिलांच्या योगदानातून उभारणी; ‘तेजस्विनीभवना’चे
लोकार्पण
लोकसंचालित साधन केंद्राचे कार्य
इतर विभागांसाठी अनुकरणीय
-
जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 10 : महिला आर्थिक
विकास महामंडळांतर्गत लोकसंचालित साधन केंद्र व बचत गटांतील महिलांच्या योगदानातून
निर्माण झालेले तेजस्विनीभवन हा पथदर्शी उपक्रम आहे. साधन केंद्रातर्फे उभारलेली ही
महाराष्ट्रातील प्रथम इमारत असून, इतर सर्व विभागांसाठी हे कार्य अनुकरणीय असल्याचे
प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे केले.
डाबकी रस्त्यावरील उगलेवाडीत ‘तेजस्विनी भवन’ साकारण्यात आले असून,
या वास्तूचे उद्घाटन जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. जि. प.
मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, ‘महाबीज’चे योगेश कुंभेजकर, ‘माविम’च्या व्यवस्थापकीय
संचालक माया पाटोळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, राजश्री कोलखेडे,
महामंडळाचे विभागीय अधिकारी केशव पवार, विभागीय उपजिविका सल्लागार पवन देशमुख, जिल्हा
समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे, केंद्राच्या अध्यक्ष सुवर्णा वाघमारे व व्यवस्थापक
सोनाली अंबरते आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, बचत गटांच्या चळवळीतून एक चांगली
वास्तू निर्माण झाली. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली की कुटुंबाचा व समाजाचाही विकास
होतो. त्यादृष्टीने विविध व्यवसाय, उपक्रमांची जोड देऊन हे कार्य आणखी पुढे न्यावे.
शेतीपूरक व्यवसायांबरोबरच इतर व्यवसायांचाही विचार व्हावा. लोकसंचालित साधन केंद्राचे
कार्य इतर विभागांसाठी अनुकरणीय आहे.
‘महाबीज’तर्फे बीजोत्पादन कार्यक्रमाच्या विविध कामांशी बचत गटांना
कसे जोडता येईल, याचा निश्चित प्रयत्न करू. यादृष्टीने ‘माविम’च्या प्रस्तावाबद्दल
सकारात्मक राहू, अशी ग्वाही श्री. कुंभेजकर यांनी दिली.
श्रीमती पाटोळे म्हणाल्या की, ‘माविम’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षात केंद्राची
स्वबळावर इमारत उभी राहिली. हे महिलांच्या स्वयंपूर्णतेचे आदर्श उदाहरण आहे. जिल्ह्यात
तूर डाळ, सोयाबीन, कपाशी ही प्रमुख पीके आहेत. कृषी प्रक्रिया व्यवसायांचे जाळे, बचत
गटांची चळवळ दृढ करणे, फेडरेशनची निर्मिती अशी वाटचाल व्हावी असेही त्यांनी सांगितले.
अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांचे समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे,
सुनील सोसे, राजेश नागपुरे, सुमेध तायडे, विलास वानखडे यांच्यासह ‘नाबार्ड’चे श्रीराम
वाघमारे, गंगाप्रसाद स्वामी आदी उपस्थित होते. श्रीमती खोब्रागडे यांनी प्रास्ताविक
केले. श्रीमती अंबरते यांनी आभार मानले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा