जिल्हाधिकाऱ्यांकडून रोहयो योजनेचा सविस्तर आढावा 'मनरेगा'च्या कामाला गती द्या जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि ९ : जिल्ह्यात 'मनरेगा'ची कामे व्यापक स्वरूपात होणे आवश्यक आहे. रोजगारनिर्मितीबरोबरच विकास कामांना देणारी ही महत्त्वपूर्ण योजना आहे. त्यामुळे 'मनरेगा'मध्ये अधिकाधिक कामे राबवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेत मनरेगा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजील्हाधिकारी रोजगार हमी योजना विजय पाटील, सामाजिक वनीकरण विभागाचे वन अधिकारी, तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपवनसंरक्षक डॉ कुमार स्वामी उपस्थित होते.
योजनेत वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण कामे व्यापक स्वरूपात राबवली जाणे आवश्यक आहे. मात्र संबंधित यंत्रणा सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग आदींकडून पुरेशी कार्यवाही झालेली नाही. त्यात तत्काळ सुधारणा करावी.
सार्वजनिक बांबू लागवडीबरोबरच इतर कामांना चालना द्यावी. अधिकाधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिले.
यावेळी त्यांनी कुरण लागवड, तुती(रेशीम) लागवड, सिंचन विहिरी, फळबाग लागवड, पाणंद रस्ते यासह विवीध बाबींचा आढावा घेतला.
वनविभाग, सामजिक वनीकरण, कृषी विभाग व सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मनरेगा अंतर्गत 301 ग्रामपंचायत स्तरावर 6 हजार 710 मजुरामार्फत 1 हजार 584 ठिकाणी सध्या कामे सुरू असून 377 कामे अकोला, 300 पातूर, 216 अकोट, 218 मुर्तिजापूर,193 बाळापूर तर 192 कामे बार्शीटाकळी तालुक्यात सुरू आहेत.
वैयक्तिक व सार्वजनिक बांबू लागवड अंतर्गत जिल्हयात 273 हेक्टर क्षेत्रफळावर 465 कामे सद्य:स्थितीत सुरू आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा