नियोजित कामांच्या मान्यतांची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करा -जिल्हाधिकारी अजित कुंभार




जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

नियोजित कामांच्या मान्यतांची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करा

-जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 3 : डिसेंबर महिना आला तरीही अद्याप अनेक विभागांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही पूर्ण झालेली नाही. हे गंभीर आहे. ही कार्यवाही तत्काळ पूर्ण करून विकासकामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक नियोजनभवनात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प संचालक मोहनकुमार व्यवहारे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, समाजकल्याण सहायक आयुक्त अनिता राठोड, नियोजन अधिकारी कैलास देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यात मंजूर नियतव्ययानुसार विविध विकासकामे विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही होऊन विकासकामांना चालना मिळाली नाही तर निधी इतर विकासकामांकडे वळविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.  

ज्या विविध विकासकामांना चालना देण्यात आली, ती  तत्काळ पूर्ण होणे आवश्यक आहे. कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत. शाळा बांधकामअंतर्गत 38 कामांपैकी 6 पूर्ण व 31 प्रगतीपथावर आहेत, ती पूर्ण व्हावीत. पशुवैद्यकीय संस्थांना औषधपुरवठाअंतर्गत पुढील तरतुदीसाठी प्रस्ताव येणे आवश्यक होते. तो तत्काळ द्यावा. जिल्हा रूग्णालयाला तीन रूग्णवाहिकांसाठी वाढीव निधी लागल्यास उपलब्ध करून दिला जाईल. सर्व विभागांनी आयपास प्रणालीचा वापर करूनच कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

सर्व विभागांनी आपल्याकडील अखर्चित निधी तत्काळ जमा करण्याची, तसेच आवश्यक अनुपालनाची पूर्तता करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. लघुपाटबंधारे, वन, औद्योगिक प्रशिक्षण, क्रीडा, मत्स्यसंवर्धन, महावितरण, महाऊर्जा, रस्ते सुरक्षा विकास आदी विविध विभागांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

 

 विविध विभागांनी प्रत्येक कामांच्या सद्य:स्थितीसह अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा. ज्या कामांच्या मान्यता, निविदा आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण नसतील, त्या पुढील दोन आठवड्यात पूर्ण करून घ्याव्यात. यावेळी जिल्हाधिकारी गतवर्षीच्या नियोजनानुसार खर्चाचा आढावा घेतला.

 पुढील वर्षात करावयाच्या कामांचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत.  विविध क्षेत्रांतील कामांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार कामांचा समावेश करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

०००

 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :