शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर









 शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर


पात्र शिक्षकांनी वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करावेत

- जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि. 30 : अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदार संघाच्‍या दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्‍याने तयार करण्‍याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी विहित नमूना-19 मधील अर्ज आवश्यक पुरावे व प्रमाणपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.  

शिक्षक मतदारसंघासाठीच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबत कार्यक्रम व वेळापत्रकाची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर उपस्थित होते.

विभागीय आयुक्‍त अमरावती तथा मतदार नोंदणी अधिकारी, शिक्षक मतदार संघ यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची यादी तयार करण्‍याकरिता जाहीर सूचना परिशिष्ट ब व प्रथम अनुसूची दि. 30 सप्‍टेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला,  जिल्‍हा परिषद कार्यालय, अकोला, महानगरपालिका कार्यालय, अकोला, जिल्‍हयातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगर परिषद, नगर पंचायत  कार्यालय येथे प्रसिध्‍द केली आहे.  

पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्‍पे

मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(3) अन्‍वये जाहीर सूचना दि.30 सप्‍टेंबर प्रसिद्ध करण्यात आली. मतदार नोंदणी अधिनियमानुसार वर्तमान पत्रातील सूचनेची  प्रथम पुनर्प्रसिध्‍दी दि.15 ऑक्‍टोबर रोजी होईल. वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुनर्प्रसिध्‍दी दि.25 ऑक्‍टोबर रोजी होईल. नमूना-19 व्‍दारे अर्ज स्‍वीकारण्‍याची शेवटची तारीख 6 नोव्‍हेंबर आहे. हस्‍तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई दि.20 नोव्‍हेंबर रोजी होईल. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्‍दी दि.25 नोव्‍हेंबर होईल.
दावे व हरकती स्‍वीकारण्‍याचा कालावधी दि.25 नोव्‍हेंबर ते दि. 10 डिसेंबर असा आहे. दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करणे, छपाई करणे यासाठी  दि.25 डिसेंबर हा दिवस निश्चित आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी दि.30 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.
                                                                                                                        नमुना १९ ऑनलाईन उपलब्ध
मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी अमरावती विभागीय आयुक्‍त हे मतदार नोंदणी अधिकारी असून अकोला जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे जिल्हयातील सर्व उप विभागीय अधिकारी हे सहायक मतदार नोंदणी असून जिल्हयातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार हे पद‌निर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्‍यांच्या कार्यालयामध्‍ये नमूना-19 मधील अर्ज दि. 6 नोव्‍हेंबरपर्यत सादर करता येतील.

नमूना-19 मधील अर्ज वरील ठिकाणी तसेच मुख्य निवडणूक अधिका-यांच्या संकेतस्थळावर ( https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Graduates-and-Teachers-Constituencies-2025.aspx ), त्याचप्रमाणे अकोला जिल्हा प्रशासनाच्या https://akola.gov.in/ या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत.

मतदार पात्रतेचे निकष

जी व्‍यक्‍ती भारतीय नागरिक आहे, आणि त्‍या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी आहे व लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्‍या अधिनियम 27(3)(ब) खाली राज्य शासनाने निवडणूक आयोगाच्या मान्‍यतेने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्‍थांमध्‍ये दिनांक 1 नोव्‍हेंबर, 2025 च्‍या लगत पूर्वीच्‍या 6 वर्षामध्ये किमान 3 वर्षे पूर्णवेळ शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक मतदार म्‍हणून नोंदणीस पात्र असून त्‍यांना मतदार नोंदणीसाठी सुधारित नमुना क्रमांक-19 मध्ये आवश्यक कागदपत्रांसह व प्रमाणपत्रांसह अर्ज सादर करता येईल.

या कार्यक्रमानुसार अमरावती विभागासाठीची शिक्षक विधानपरिषद मतदार संघाची यादी नव्‍याने तयार करण्‍यात येणार असल्‍याने ज्या व्यक्‍तींची नावे अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या विद्यमान मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, त्यांनीही नव्याने नमूना–19 आवश्यक कागद‌पत्रांसह व प्रमाणपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.
   
एकगठ्ठा अर्ज स्वीकारणार नाही

नमूना क्रमांक-19 मधील एकगठ्रठा अर्ज, मग ते व्‍यक्तिशः दाखल केलेले असोत अथवा पोस्‍टाने पाठविलेले असोत, मतदार नोंदणीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.  तथापि, पात्र शैक्षणिक संस्थेचे प्रमुख हे त्यांच्या संस्‍थेतील सर्व पात्र कर्मचा-याचे अर्ज एकत्रित पाठवू शकतील. एकाच पत्‍त्‍यावर राहणा-या एखाद्या कुटुंबातील अन्य पात्र व्यक्तींचे अर्ज कुटुंबातील सदस्य दाखल करु शकेल व त्यास प्रत्‍येक सदस्‍याच्‍या संबंधातील मूळ प्रमाणपत्र सादर करुन प्रमाणपत्र सत्‍यापित करुन घेता येईल राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, रेसिडेन्ट वेलफेअर असोसिएशन यांना एकगठ्ठा अर्ज करता येणार नाहीत.
शिक्षक मतदार संघातील अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी वेळापत्रकानुसार पदनिर्देशित अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्‍या कार्यालयात विहित नमूना-19 मधील अर्ज आवश्यक ते पुरावे व प्रमाणपत्रांसह दाखल करावेत व अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात आपला सह‌भाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.
०००

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा