मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ गावाला समृद्ध करण्याची संधी ; एकजुटीने प्रयत्न करा पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर
अकोला, दि. १७ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही आपल्या गावाला समृद्ध करण्याची संधी आहे. या अभियानातील उद्दिष्टांची पूर्तता करून गाव उन्नतीप्रत नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज कापशी येथे केले.
ग्रामविकास विभागातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, तसेच राष्ट्रीय पोषण माह या उपक्रमांचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते कापशी येथे विशेष ग्रामसभेत झाला, त्यावेळी ॲड. फुंडकर यांनी गावकरी बांधवांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, महिला व बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे, सरपंच वेणूताई उमाळे, उपसरपंच अंबादास उमाळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते .
पालकमंत्री ॲड फुंडकर म्हणाले की, अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करून गावाचे व जिल्ह्याचे नाव राज्यात झळकावे, गावाची सर्वत्र आदर्श गाव म्हणून ओळख व्हावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे.
गावात सुशासन, सक्षम पंचायत,
जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव,
मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजिवीका विकास, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे या उद्दिष्टांबरोबरच नाविन्यपूर्ण उपक्रम गावात राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना, श्रीमती मेश्राम, श्री. उमाळे यांचीही भाषणे झाली. राष्ट्रीय पोषण माह उपक्रमानिमित्त विशेष प्रदर्शनाचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. सुपोषणासाठी आवश्यक कडधान्य, भाज्या, पदार्थांची माहिती प्रदर्शनाद्वारे सादर करण्यात आली.
तालुकास्तरावरही मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. ग्रामसभेत प्रशिक्षकांकडून अभियानाच्या विविध टप्प्यांची माहिती देण्यात आली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा