आरोग्यमंत्र्यांकडून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा आवश्यक पदे, ट्रामा केअर सेंटर निर्मितीसाठी सकारात्मक सर्व योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवा - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, आरोग्य उपसंचालक डॉ. वाकचौरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, ग्रामीण भागातील रूग्णालयांमध्ये सर्पदंशावरील लस, औषधे उपलब्ध असतानाही रूग्णांना शहरात यावे लागते अशा तक्रारी आहेत. रूग्णांसाठी ज्या ज्या सुविधा शासनाने करून दिल्या आहेत, त्या गरजूंपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.
गर्भलिंगनिदानाबाबत कठोर कायदे असतानाही असे प्रकार घडत असल्याच्याही तक्रारी आहेत. तसे होत असल्यास कठोर कार्यवाही करावी. पथकांनी अचानक तपासण्या कराव्यात. तपासण्यांची संख्या वाढवावी. मात्र, असा प्रकार कदापि कुठेही घडता कामा नये, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात ट्रॉमा केअर सेंटर नाही. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव द्यावा. ते पूर्ण होण्यासाठी निश्चितपणे सहकार्य करू. आयुष्मान भारत योजनेसारख्या विनामूल्य उपचार उपलब्ध करून देणा-या योजना गरीबांपर्यंत पोहचवा. अधिकाधिक रूग्णालयांचा समावेश करा. लोकप्रतिनिधींच्या सूचना अमलात आणून कामाची त्यांना वेळोवेळी माहिती द्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिकाधिक सुसज्ज राहतील यासाठी सदोदित प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रुग्णालयांमधील अस्वच्छतेबाबतही तक्रारी आहेत. त्यात तत्काळ सुधारणा करावी. जबाबदार संबंधितांस समज द्यावी. त्याबाबत पुन्हा तक्रारी आल्यास कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शिवापूर येथील रुग्णालय इमारतीची पाहणीही त्यांनी केली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा