अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सीएससी केंद्रामधून मिळणार माफक दरात सेवा

 

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

सीएससी केंद्रामधून मिळणार माफक दरात सेवा

अकोला, दि. 18 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता सीएससी केंद्रामधून महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार महामंडळाच्या मुख्य कार्यालयामध्ये महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व सीएससी केंद्राचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.

या करारानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्रावर जावून महामंडळाच्या योजनांचा लाभ कमी दरात घेऊ शकतील. यामध्ये महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्य:स्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यांसारख्या सुविधांचा रामावेश आहे.

सीएससी केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खाजगी सेवा पुरवण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. महामंडळाने सीएससी केंद्रासमवेत केलेल्या करारामुळे महामंडळाच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल.

यावेळी महामंडळाचे अध्यक्ष म्हणाले, या करारामुळे आमची उद्दिष्ट्ये अधिक प्रभावीपणे पूर्ण होतील. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गरजू आणि पात्र तरुणांपर्यंत महामंडळाच्या योजना पोचणार आहेत. कमी खर्चात आणि त्यांच्या घराजवळच त्यांना आवश्यक सेवा मिळाल्यामुळे त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करुन मराठा समाजातील तरुणांना उद्योजक करण्याचे महामंडळाचा उद्देश पुर्णत्वस नेणे सोपे होईल. राज्यामध्ये सीएससीचे ७२ हजार पेक्षा जास्त केंद्र कार्यरत असल्याने त्यांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावातूनच पात्रता प्रमाणपत्र,  कागदपत्र, बँकेचे कर्ज मजुरी, बँकेचा हप्ता अपलोड करण्यासाठी प्रत्येकी ७० रू. शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली. या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे आणि त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज लागणार नाही. ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना मिळेल. यामुळे सद्यस्थितीत महामंडळाच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पैसे उकलणाऱ्या अनधिकृत एजंट लोकांना आळा घालणे शक्य होईल. भविष्यात लाभार्थ्यांसाठी महागंडळाचे मोबाईल अॅप व चॅट बॉट सारख्या सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशीर होईल असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी व्यक्त केले.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा