केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांकडून विविध रूग्णालयांना भेट व पाहणी उत्तम उपचार सुविधा हा प्रत्येक गरजूचा हक्क नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी केंद्र शासनाच्या विविध योजना - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांकडून विविध रूग्णालयांना भेट व पाहणी
उत्तम उपचार सुविधा हा
प्रत्येक गरजूचा हक्क
नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी
केंद्र शासनाच्या विविध योजना
-
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव
अकोला, दि. १ : उत्तम उपचार सेवा मिळणे हा प्रत्येक गरजू
नागरिकाचा अधिकार आहे. गरजूंना आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भारत योजनेबरोबरच
अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण
राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज येथे केले.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी आज शहरातील विविध
रूग्णालयांना भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे, रामदासपेठेतील स्माईल सुपरस्पेशालिटी
निओनेटल अँड पेडियाट्रिक हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत
होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अतुल चांदुरकर, खासदार अनुप धोत्रे, ज्येष्ठ
आरोग्यतज्ज्ञ डॉ नानासाहेब चौधरी, ज्येष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा, डॉ. पार्थसारथी
शुक्ल, डॉ. दीपाली शुक्ल, डॉ. दीपक लोटे, पुष्पा बाजीराव महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ.तरंगतुषार वारे, अमर्त्य शुक्ल, उर्वी शुक्ल आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले की, केंद्र शासनातर्फे
आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून विविध आजारांवर विनामूल्य उपचार सुविधा उपलब्ध
करून देण्यात आल्या आहेत. आयुष मंत्रालयामार्फत आयुर्वेद,योगा, निसर्गोपचार, युनानी,
होमिओपॅथी अशा विविध उपचार पद्धतींद्वारे सार्वजनिक आरोग्य रक्षणासाठी आरोग्य क्षेत्र
दृढ करण्याचा प्रयत्न होत आहे. भारत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.
70 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना अतिरिक्त ५ लक्ष रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येणार
आहे. कुठलाही गरीब रूग्ण उपचारापासून वंचित
राहू नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे. मानवसेवा ही ईश्वरसेवा हे व्रत सांभाळून शुक्ल
कुटुंबिय १८६० पासून रूग्णसेवेत आहेत. या हॉस्पिटलद्वारे अधिकाधिक लोकसेवा घडावी, अशा
शुभेच्छा त्यांनी दिल्या.
न्या. चांदूरकर, खासदार श्री. धोत्रे, डॉ. चौधरी यांनी शुभेच्छापर
मनोगत व्यक्त केले. निखिल महाजन यांनी आभार मानले.
डॉ. हेडगेवार हॉस्पिटलची पाहणी
केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी राऊतवाडी येथील डॉ.
हेडगेवार रूग्णालय व संशोधन केंद्राला भेट देऊन पाहणी केली. संस्थेचे सचिव संदीप हातवळणे,
उपाध्यक्ष संजीव सोमाणी, डॉ. विनायक देशमुख यांनी स्वागत केले. संस्थेतील डायलिसीस
युनिट, आपत्कालीन कक्ष, बाह्य रूग्ण विभागाला भेट देऊन तेथील नवीन यंत्रणा, सुविधांची
पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी रूग्णांशी संवाद साधून विचारपूस केली. जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. तरंगतुषार वारे यावेळी उपस्थित होत्या.
मानव सन्मित्र इस्पितळाला भेट
अकोट रस्त्यावरील मानव सन्मित्र रूग्णालयाला केंद्रीय राज्यमंत्री
श्री. जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मनोगताद्वारे केंद्र
शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. डॉ. दीपक केळकर यांनी यावेळी रुग्णालयाच्या
उपक्रमांची माहिती दिली. विजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे आदी
उपस्थित होते. त्यांनी गंगाधर प्लॉटमधील शुक्ल चिल्ड्रेन हॉस्पिटल येथे भेट देऊन सुविधांची
पाहणी केली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा