विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नोडल अधिका-यांची बैठक ‘डेटा’ संकलन व ‘अपडेशन’ची प्रक्रिया अचूकपणे राबवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नोडल अधिका-यांची बैठक

‘डेटा’ संकलन व ‘अपडेशन’ची प्रक्रिया अचूकपणे राबवा

-        जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 4 : निवडणुकीतील वेगवेगळ्या बाबींचा ‘डेटा’ अत्यंत मूलभूत असून, त्याचे संकलन व अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सर्व स्तरावर समन्वय ठेवून निर्दोष व अचूकपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नोडल अधिका-यांची बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. सीईओ बी. वैष्णवी, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह विविध नोडल अधिकारी उपस्थित होते.  

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, निवडणुकीतील प्रत्येक बाबीची जबाबदारी नोडल अधिका-यांनी समजून घ्यावी व त्यानुसार अचूकपणे, तसेच  वेळेत कार्यवाही करावी. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. उमेदवारांना आवश्यक परवानग्या वेळेत मिळण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘एक खिडकी’ योजना कार्यान्वित करण्यात येईल. पोलीस बंदोबस्त व सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे.

निवडणूक आयोगाच्या प्रत्येक सूचनेचे दक्षतापूर्वक पालन करावे. ‘स्वीप’च्या माध्यमातून व्यापक मतदार जनजागृती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

विधानसभा निवडणूक : विविध नोडल अधिकारी

स्वीप समितीची जबाबदारी जि. प. सीईओ बी. वैष्णवी, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समितीची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, कायदा व सुव्यवस्था, टपाली मतपत्रिका, सर्व्हिस वोटर तसेच प्रशिक्षण व कर्मचारी व्यवस्थापनाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, तर सी-व्हिजील, डॅशबोर्ड, जिल्हा संपर्क आराखड्याची जबाबदारी जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

जिल्हा निवडणूक विभागाची जबाबदारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्याकडे आहे.

वाहतूक व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी रवींद्र भुयार, मतदार केंद्र सुसुत्रीकरण समितीचे नियंत्रण अधिकारी अतुल सोनवणे, मतपत्रिका समिती, निवडणूक साहित्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार, तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे व्यवस्थापन उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

उमेदवारांचे खर्चविषयक व्यवस्थापन जि. प. उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश धोंगडे यांच्याकडे, तर प्रसारमाध्यम व संदेशवहन हर्षवर्धन पवार यांच्याकडे आहे. जिल्हा नियंत्रण मदत कक्षाचे नोडल अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मनोज जाधव हे आहेत. दिव्यांग कक्षाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्याकडे, तर निवडणूक निरीक्षकांचे मुख्य संपर्क अधिकारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे हे आहेत.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले